BREAKING NEWS
Search

एकनाथ शिंदे यांच्या बंडा मुळे ग्रामीण भागांतील शिवसैनिकांची गोची ; गावपातळीवरील शिवसैनिकांपुढे पेच प्रसंग

674

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकिय बंडा मुळे ठाणे जिल्ह्यासह राज्यांतील ग्रामीण भागातील शिवसैनिकांची गोची झाली आहे. गावपातळीवर शिवसेनेच्या आदेशानुसार काम करणाऱ्या शिवसैनिकापुढे पेच प्रसंग निर्माण झाले असून, मातोश्री की शिंदे? अश्या गर्तेत शिवसैनिक अडकले आहेत. मुरबाड सारख्या ग्रामीण भागात आनंद दिघे यांचे खूपच प्रभुत्व होते. आनंद दिघे यांच्या नंतर ठाणे जिल्ह्याची शहरी भागासह ग्रामीण भागाची शिवसेनेची धूरा एकनाथ शिंदे यांनी सांभाळत ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क तयार केला व शिवसेेना ग्रामीण भागात भक्कम केली. यामुळें तरूण वर्गाला शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित केले होते. माञ शिवसेनेचा सर्व कारभार मातोश्री वरूनच चालतो पण आता शिंदे यांनी मातोश्रीलाच बंडाचे सुरुंग लावून हादरा दिल्याने या हादऱ्याने ग्रामीण भागातील तरूण हादरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत वरिष्ठ नेते ऐकून घेत नसल्याने तत्कालीन शिवसेना शहरप्रमूख राम दुधाळे यांनी एनवेळीं भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुरबाड तालुक्यात शिवसेनेत राजकिय भूकंप झाला होता. मात्र भाजप व शिवसेना यांच्या युतीचे सरकार गेल्यावर व महाविकास आघाडी सरकार आल्यावर भाजप विरुद्ध शिवसेना असा राजकिय संघर्ष झाला. यात ग्रामीण पातळीवर शिवसेना व भाजप यांच्यात राजकिय संघर्ष ही वाढला. तर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या सहकार क्षेत्रातील पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप वर्चस्वाची लढाई पहायला मिळाली. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत माजी राष्ट्रवादीचे आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून मुरबाड मधील सत्ताधारी भाजपला थोपवण्यासाठी शिवसेना वाढीचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेतून बंड पुकारून भाजप बरोबर हिंदुत्वाच्या मुद्यावर सत्ता स्थापन करा या मागणीमुळे ग्रामीण भागात भाजप बरोबर राजकिय दोन हात करणाऱ्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांना पुन्हा युती झाल्यास  झेंडा उचलावा लागतो का ? या प्रश्नाने ग्रामीण भागातील शिवसैनिकांना सतावत असून कार्यकर्त्यांनी चूक केली तर गद्दारी आणि नेत्यांनी केली तर सोय प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *