BREAKING NEWS
Search

कोरोनाच्या ताणतणावातही जिल्हा परिषदेत पदोन्नतीचा दिलासा ; वित्त व शिक्षण विभागातील ४५ कर्मचाऱ्यांना होळी भेट

288

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : एकिकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढलेला कामाचा ताण व स्वत:ची खबरदारी घेत कार्य करणाऱ्या जिल्हा परिषदेतील वित्त व शिक्षण विभागातील ४५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतून दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांच्या प्रयत्नाने पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आला. अनेक महिन्यांपासून पदोन्नतीकडे डोळे लावून बसलेल्या कर्मचाऱ्यांना होळी निमित्ताने पदोन्नतीची भेट मिळाली. दरम्यान, मुरबाड तालुक्यात शिक्षण विभागाच्या ६ नव्या विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक आणि अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न रखडलेला होता. त्याबाबत कर्मचाऱ्यांकडून मागणी केली जात होती. मात्र, कोरोना आपत्तीच्या काळात प्रशासनाकडून आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून कोरोना आपत्तीच्या काळात सोपविलेली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडली जात होती. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी पदोन्नतीसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली होती. अखेर आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दांगडे यांनी शिक्षण विभागातील ३३ व वित्त विभागातील १२ पदोन्नतीचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग ३ श्रेणी २ मधील ८, विस्तार अधिकारी वर्ग ३ श्रेणी ३ मधील ७ आणि प्राथमिक शिक्षकांमधून मुख्याध्यापकपदावर १८ जणांना पदोन्नती देण्याचा निर्णय जारी करण्यात आला. या संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक संतोष भोसले यांनी आदेश जारी केला. शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मंजूरीसाठी १५९ शिक्षकांचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. त्याचबरोबर शिक्षक निवडश्रेणीसाठी कार्यवाही प्रस्तावित असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तसेच वित्त विभागाच्या १ सहायक लेखा अधिकारी, ४ कनिष्ठ लेखा अधिकारी, ७ वरिष्ठ सहाय्यक अशा एकूण १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आदेश जारी करण्यात आले. या दोन्ही विभागातील पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांचे पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांकडून आभार मानण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *