BREAKING NEWS
Search

दक्ष पोलीस व प्रामाणिक रिक्षा चालकामुळे चार तोळे सोनं महिलेला परत मिळाले

519
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : प्रवासा दरम्यान विसर पडलेल्या सोन्याचे दागिने असलेल्या बॅगेचा अवघ्या काही तासांत शोध घेऊन महिलेला सुपूर्द केल्यामुळे मुरबाडचे दक्ष पोलिस कर्मचारी व प्रामाणिक रिक्षा चालक यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील वांजळे येथे राहणारे दिपक वामन लाटे (३३) व त्यांची पत्नी नूतन दिपक लाटे (२८) या दांपत्यांनी सकाळी ९ च्या सुमारास मुरबाड येथे येण्यासाठी महामार्गावर एमएच ०५ बीक्यू २५१० क्रमांकाच्या एका प्रवासी रिक्षात बसले. यावेळी त्यांच्या सोबत कपडे, चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले व अन्य दागिने असे सुमारे दोन ते अडीच लाखांचे मुद्देमाल असलेली एक सामानाची बॅग होती.
मात्र मुरबाड येथे रिक्षातून उतरतांना रिक्षाच्या मागे ठेवलेली सदर बॅग घेण्याचा या दाम्पत्यांना विसर पडला. काही वेळाने लाटे यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तिनहात नाका येथील पोलिस चौकीवर धाव घेतली व सदर ठिकाणी उपस्थित असलेले पोलिस नाईक विजय गांजळे यांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिस नाईक गांजळे यांनी तात्काळ सीसीटीव्हीच्या साहाय्याने सदर रिक्षाचा शोध सुरू केला व स्थानिक रिक्षा चालक तसेच शिवळे, सरळगाव येथील रिक्षा चालक यांचेशी संपर्क साधून रिक्षाचा वर्णन कळविला. सदर वर्णानाची रिक्षा सरळगाव येथे आढळून आल्याचे संपर्क साधण्यात आलेल्या रिक्षा चालक देविदास शिंगोळे यांनी गांजळे  यांना सांगितले. सदर बॅगेमध्ये असलेला मुद्देमाल सुरक्षित असल्याची खात्री करून जबाबदार मंडळींच्या उपस्थितीत लाटे दाम्पत्यांना ऐवज सुपूर्त केला. मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरण जलदगतीने मार्गी लावण्यात आले असून, पोलिस नाईक विनायक खेडकर, मेजर शरद शिरसाट तसेच महिला पोलिस नाईक होवाळ यांच्या सहकार्यमुळे मुद्देमाल वेळेत मिळाल्याचे गांजळे यांनी सांगितले. या घटनेमुळे कर्तव्य दक्ष पोलिस कर्मचारी व प्रामाणिक रिक्षा चालक यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *