BREAKING NEWS
Search

मुरबाड नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या गतिविधींना वेग ; इच्छुक उमेदवारांची गुप्त चाचपणी

456
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : राज्यातील आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी वर कोरोनाचा संकट असल्याने कदाचित या निवडणुका पुढे जाण्याची ही शक्यता आहे. असे असताना राज्यात मागील पाच वर्षापूर्वी स्थापन झालेल्या नगरपंचायत पैकी मुरबाड नगरपंचायतीचा कालावधी 31 ऑक्टोबर 2020 पासून संपत असल्याने मुरबाड नगरपंचायतच्या  नगरसेवक पदी खुर्ची वर बसणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण यासाठी कोणाला कुठून संधी प्राप्त होईल कुणाची कुठल्या पक्षातून वर्णी लागेल हे सध्या तरी ओळखणे कठीण झाले आहे.
2014 ला  नगरपंचायत स्थापनेवेळी मुरबाड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. तरीही त्यांच्याकडे नगरपंचायत लढविण्यासाठी 17 उमेदवार नव्हते. काँग्रेसची परिस्थिती चांगली नसताना एक उमेदवार त्यांचा निवडून आला होता. तर आज तालुक्यातील सत्ताधारी भाजप कडेही त्यावेळी 17 उमेदवार नव्हते असे असताना  शिवसेनेच्या गटबाजीचा फायदा घेत एका गटाचे 6 उमेदवार घेऊन एकहाती नगरपंचायत वर भाजपने वर्चस्व मिळवले. यांचे श्रेय आमदार किसन कथोरे यांनाच जाते. भाजपकडे आमदार किसान कथोरे यांची रणनीती व अनुभव आहे तसेच निर्णय क्षमता असल्याने भाजपकडे सध्या नव्या उमेदवारांचा कल आहे. तर राष्ट्रवादी जो मागील वेळी मुरबाड बालेकिल्ला होता, आज तो सर्व जागा लढवेल का ?  यात शंका आहे. राष्ट्रवादीची धुरा राज्याच्या वरच्या फळीत काम करणारे प्रमोद हिंदुराव यांच्यावर आहे. तर काँग्रेस पूर्वी जशी होती तशीच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस किती आव्हान तयार करते व लढा देते याकडे विशेष लक्ष असेल. असे असताना गेली अनेक वर्षे तालुक्यात नेतृत्व नेसलेली शिवसेनेला आता ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले सुभाष पवार यांचे नेतृत्व मिळाल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. यामुळे शिवसेना व भाजपकडे उमेदवारीसाठी आता पासून अंतर्गत चाचपणी सुरू झाली आहे. तर नगरपंचायत स्थापने पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधी पक्षाची भूमिका प्रखर पणे मांडली. अनेक अदोलन करत जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावली असे असताना आर्थिक परिस्थिती बिकट असलेला मनसे किती तग धरतो की, कुणाच्या सोबत जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र भाजपकडून नव्याना संधी मिळते की जुन्याना डावलले जाते याकडे लक्ष असताना आमदार किसन कथोरे यांची कुणावर उमेदवारीसाठी कृपादृष्टी होणार हा विषय महत्वाचा ठरणार आहे. सध्या मुरबाड नगरपंचायतने शहरात अनेक विकास कामे केली असे म्हटले जाते. मात्र शहराचा मुख्य रस्ता हा विकास आराखड्यानुसार नसून रस्त्याच्या दुतर्फा सुशोभित गाळे बांधले पण ते नगरपंचायत नेच अनधिकृत ठरविले, शहराचे मुख्य प्रवेशद्वार बनवले पण ते नगरपंचायत नेच अनधिकृत ठरविले, रस्त्याच्या मधोमध विद्यत पोल बसविले पण ते धोकादायक ठरल्याने रस्त्याच्या लगत काढून पुन्हा लावावे लागले, रस्त्याच्या लगत असलेल्या गटारींची कामे काही ठिकाणी अपूर्ण आहेत, मुरबाड पंचायत समितीची सुरक्षा भिंत विकासासाठी नगरपंचायत पाडली पण ती पंचायत समितीच्या मागणी नंतरही तशीच ठेवली, एकंदरीत भाजपच्या विद्यमान सत्ताधारी नगरसेवकांची मनमानी मतदारांनी पहिली आहे, नगरपंचायत च्या काळात पाच नगराध्यक्ष झाले. पण फक्त सहीचे मालक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्त होत आहे. मात्र येत्या 31 ऑक्टोबर 2020 ला सर्व विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल संपणार असल्याने नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी सर्व राजकिय पक्ष कामाला लागलेत. मुरबाड नगरपंचायतवर 31 ऑक्टोबर पासून प्रशासकीय कारभार सुरू होणार आहे. हा किती वेळ राहील हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जरी अवलंबून असेल तरी राजकीय पक्षांच्या उमेदवार चाचपणीच्या गतीविधींना वेग आल्याचे दिसत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *