BREAKING NEWS
Search

रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून २ वर्षाच्या चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू – कवठे येमाईच्या काळूबाईनगर मधील दुर्दैवी घटना – ठेकेदाराचा हलगर्जीपणा झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

1347
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या काळूबाई नगर परिसरात सुरु असलेल्या अष्टविनायक महामार्गाच्या कामासाठी मंदीरानजीक रस्त्याच्या कडेलाच सुमारे दोन महिन्यापूर्वी खोदून ठेवलेल्या व सुमारे ८ फूट खोल पाणी असलेल्या खड्ड्यात आज दि. १५ ला सकाळी साडे अकराच्या सुमारास नजीकच राहणाऱ्या संतोष रामदास इचके यांच्या दोन वर्षाच्या श्रेया या चिमुकलीचा खड्ड्यातील पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संतप्त नागरिकांनी रस्ता बंद करीत संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने काळूबाईनगर परिसरात ऐन दिवाळीच्या काळात शोककळा पसरली आहे.
           घटनेची माहिती शिरूर पोलिसांना मिळताच व घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहायक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे,कॉन्स्टेबल पालवे,व त्यांचे सहकारी तात्काळ दुचाकीवरूनच घटनास्थळी हजर झाले.श्रेया इचके या एका चिमुकलीचा दुर्दैवी करूण अंत झाल्याने जमलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली व त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत घटनेची सविस्तर माहिती घेतली. तर संबधीत घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सपोनि काबुगडे यांनी नातेवाईक व उपस्थितांना दिले. त्यानंतर जमाव शांत झाला व दुपारी ३ च्या दरम्यान या चिमुकलीचा मृतदेह पोस्ट मार्टेम साठी हलविण्यात आला.
         घटनेचे गांभीर्य पाहता काळूबाई मंदिरानजीकच्या रस्त्याच्या कडेला खोलवर खड्डा खोदून ठेवलेल्या बेजबाबदार ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,मारुती इचके व मृत मुलीचे वडील संतोष इचके व संतप्त नागरिकांतून करण्यात आली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *