BREAKING NEWS
Search

पावसाच्या दडीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत ; शेतकरी आर्थिक संकटात

524

पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसां पासून वरून राजा दडी मारून बसल्याने व शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पीक तापत्या उन्हामुळे करपले तर काही शेतकऱ्यांनी करपलेल्या सोयाबीन पिकामध्ये ट्रॅकटरने नांगरणी केली असून, दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगावासह परिसरातील शेतकऱ्यांची खरीप पेरणी १००% आटोपली आहे. मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडताक्षणी ज्या शेतकऱ्यांनी मोठे धाडस करून खरीप पेरणी आटोपती घेतली अशा अनेक शेतकऱ्यांना दुबार परणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. तर काही शेतकऱ्यांच्या पिकाची अवस्था बऱ्यापैकी असली तरी गेल्या आठवड्या पासून पावसाच्या दडीमुळे सदर पिके तापत्या उन्हामुळे सुकत असले तरी तग धरून आहेत. परंतु कृषी विभागाच्या आवाहना नुसार २१ जून नंतर जवळ्पास ४५% शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन पीक चांगले उगवले असले तरी पावसाच्या दडीमुळे व तापत्या उन्हामुळे सदर पीक करपून गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. आलेगाव येथील शेतकरी गुलाब पुंडलीकराव गिर्हे या शेतकऱ्याने दोन एक्कर शेतातील सोयाबीन पीक करपल्याने ट्रॅकटरने नागरटी करून सदर पीक नष्ट केले असून पाऊस पडल्या नंतर पुन्हा पेरणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे बीजवाही, रासायनिक खतांसह पेट्रोल, डिझेलची दरवाढ नियमित होत असतांना शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव जैसे थे आहेत. शेतमालाच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ आकाशाला जाऊन भिडल्याने शेतकऱ्यांनी जगावं की मराव असा आर्त टाहो शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनतेला महागाईचा फटका जिव्हारी लागला आहे. तरी केंद्र सरकारने वेळीच दखल घेऊन पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीला लगाम लावून वाढत्या महागाईला रोख लावावा तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चा नुसार वाढीव हमी भाव देऊन शेतकरी हित जोपासून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *