BREAKING NEWS
Search

दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रथमच मुद्दा चर्चेत !

249
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा मुद्दा प्रथमच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाच्या नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या बैठकीत दि.बा.पाटील यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याबरोबरच समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर पावसाळ्यानंतर दोन लाख समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यामुळे प्रथमच नवी मुंबईनंतर नवी दिल्लीतही दि.बां.च्या नावासाठी आंदोलन उभे राहणार आहे.
मिठागरांमध्ये मीठ जमा करण्याचे कार्य ज्यांचे पूर्वज करीत होते, त्या देशभरातील 22 राज्यांतील लवणकार (आगरी) समाजातील निवडक प्रतिनिधींचे संमेलन नवी दिल्ली येथील राजा राममोहन मेमोरियल हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन जगद्गुरू श्री पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामीजी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे उपस्थित होते. प्राचीन लवणकार आणि व्यापारी जाती संघाच्यावतीने संयोजक कृष्ण कुमार भारती यांनी संमेलनाचे आयोजन केले होते. या बैठकीला समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राला, श्री रामृल्लू सागर, कार्यकारी अध्यक्ष एस.पी.सिंग लबाना, कर्नाटक उपारा विकास महामंडळाचे अध्यक्ष जी.के. गिरीश उपारा, तेलंगणमधील उपारी शेखर सागर, महाराष्ट्रातून दशरथ पाटील, प्रा. एन.के.हिवरकर, बाळासाहेब गोडसे, अरुण पाटील, दिपक खाटेघरे आदींची उपस्थिती होती.
नियोजित नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याचा लवणकार समाजाकडून आग्रह धरण्यात येणार आहे. नवी मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्यात दिबांचे नाव देण्यासाठी स्थानिक आगरी समाजाने केलेल्या आंदोलनाची माहिती दशरथ पाटील यांनी बैठकीत दिली. त्यानंतर इतर राज्यातील लवणकार प्रतिनिधींनीही विमानतळाला नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. तसेच त्यासाठी पावसाळ्यानंतर रामलीला मैदानात देशभरातील दोन लाखांहून अधिक समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर लवणकार समाजाच्या विविध मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात येणार आहे. रामलीला मैदानात होणाऱ्या मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यासाठी 22 राज्यातील निवडक प्रतिनिधींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *