शिरुर शहरातील १० खाजगी शाळांवर शासनाची चौकशी सुरु 

133

शाळांचे गैरव्यवहार स्पष्टपणे उघड – नाथा पाचर्णे 

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर शहरातील खाजगी शाळांचा नियमबाह्य कारभार आणि पालकांची आर्थिक लूट करून नफेखोरी करणाऱ्या दहा खाजगी शाळांच्या विरोधात भारतीय बहुजन पालक संघ गेल्या अडीच वर्षांपासून सतत पाठपुरावा करत असुन याच अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी शिरुर शहरातील दहा खाजगी शाळांची सहा महिन्यांपूर्वी समिती नेमून 12 (क) नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत शाळांचे गैरव्यवहार आणि गैरकारभार स्पष्टपणे उघड झाले आहेत. त्यामुळे सदर दोषी आढळून येणाऱ्या शाळांवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करून हजारो पालकांना न्याय द्यावा अशी मागणी नाथा पाचर्णे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी बोलताना नाथा पाचर्णे यांनी सांगितले की, शिरूर शहरातील खासगी शाळांकडून मनमानी सुरू होती.अनेकदा त्यांच्याकडून फी वाढ,तसेच विविध माध्यमातून विद्यार्थी व पालकांची पिळवणूक केली जात होती.याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संबंधित शाळांच्या विरोधात तक्रार करत लढा सुरू होता.या दिलेल्या तक्रारी नंतर शिक्षण विभागाकडून दखल घेतल्यानंतर १२ क नुसार चौकशी करण्यात आली.त्यांनतर तथ्य आढळून आल्यानंतर दि.२९.०५.२०२३ रोजी १० सदस्यीय समिती नेमण्यात आली असून सध्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यान्वये १२ (ख) नुसार चौकशी सुरू आहे.या चौकशी मध्ये दोषी आढळल्यास संबंधित दहा शाळांवर दंड अथवा मान्यता रद्द चे कारवाई देखील केली जाऊ शकते असे ते म्हणाले.खासगी शाळांकडून काही त्रास दिला जात असेल,अडवणूक केली जात असेल तर शिरूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे लेखी तक्रारी द्याव्यात असे आवाहन नाथा पाचर्णे यांनी केले आहे.या पत्रकार परिषदेस फिरोज सय्यद,सागर घोलप,अशोक गुळादे आदी उपस्थित होते.

 

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *