BREAKING NEWS
Search

अध्यात्मातून जिवन परिवर्तन – अनेकांना स्वामी सेवेची आवड लावणारा स्वामी भक्त कवठे येथील गणेश गोसावी  

51
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – अध्यात्मातून श्री स्वामी समर्थांची तन,मन,धनाने मागील तेरा वर्षांपासून अखंडित सेवा करणारा शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील श्री स्वामी भक्त गणेश जयवंत गोसावी हे होत.अतिशय गरिबीतून कष्टाने प्रापंचिक गाडा हाकणारे गणेश गोसावी यांनी श्री स्वामी समर्थांची मनापासून सेवा करताना स्वतःच्या जिवनात आमूलाग्र परिवर्तन केलेले पाहावयास मिळते. अनेकांना स्वामी सेवेची,अध्यात्माची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या ही जीवनात ,कुटुंबात आनंद निर्माण व्हावा म्हणून कवठे येथील गणेश गोसावी हे स्वामी भक्त अतिशय प्रामाणिकपणे व निस्वार्थपणे कार्य करीत आहेत.
       अगदी लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे जेमतेम नववी पर्यंत कष्टप्रद शिक्षण घेतलेले श्री स्वामी समर्थ सेवेकरी गणेश दादा गोसावी वयाच्या २० व्या वर्षीच गावातील किराणा मालाच्या दुकानात कामाला लागले. पडेल ते काम व प्रसंगी हमाली करीत त्यांनी जीवन संघर्ष अतिशय प्रामाणिकपणे व चिकाटीने सुरु ठेवला. दरम्यान लग्न झालेल्याने प्रापंचिक जीवनास सुरुवात झाली. त्यांची सहचारिणी सुनीता  यांनी देखील परस्थितीची जाणीव ठेवत गणेश यांना वेळेवेळी पाठबळ दिले. प्रपंचीक जीवनात दोन मुले,एक मुलगी असा प्रपंच बहराला. आपल्याला गरीबीमुळे शिक्षण घेता आले नाही पण मुलांना शिक्षित करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे हा संकल्प केला. थोरला मुलगा निखिल पोलीस झाला तर लहान अभिषेक व्यावसायिक झाला. मुलीचे लग्न ही करून दिले.तर आता वयाची ५२ वी जरी गाठलेली असली तरी गणेश हे मागील ७ वर्षांपासून पराग साखर कारखान्यात जॅकवेल पंपमन म्हणून प्रामाणिकपणे काम करीत कुटुंबास आर्थिक योगदान देत आहेत.
अध्यात्माची आवड व श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा ध्यास,वसा घेतल्याने जीवनात परिपूर्ण सुख,समाधान लाभत असल्याचे गणेश आवर्जून सांगतात. मागील १३ वर्षांपासून गणपती  दरम्यान येथील नवज्योत मित्रमंडळाच्या गणराया समोर प्रभातसमयी  श्री स्वामी समर्थ स्तवन व मंत्रोपचार २१ वेळा अथर्वशीर्ष, एक वेळा गणेश स्तोत्र, राम रक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, संकटमोचन हनुमान अष्टक, एक कालभैरवाष्टक, एक वेळा पुरुष सूक्त, एक वेळा सामुदायिक प्रार्थना, दररोज संध्याकाळी आरती असा हा दररोजचा उपक्रम करीत आहेत. २०११ साली श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात गेल्यानंतर ते मनापासून सेवा करीत आहेत.  परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वामीसेवेतून भरपूर काही आनंद मिळाला. अशक्य ही शक्य केवळ स्वामींच्या प्रामाणिक भक्ती व सेवेमुळेच मिळाले असल्याचे गणेश यांनी सांगितले. कवठे यमाई येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चालू करण्यापासून तर आतापर्यंत त्या अंतर्गत भरपूर आध्यत्मिक,संस्कृती व पूजा पाठ यासह अनेक प्रभोधनपर व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यासाठी गणेश यांचा मोठा सहभाग व पुढाकार असून अनेक स्वामी भक्तांच्या सहयोगातून गावचे ग्रामदैवत श्री यमाई मंदिर प्रांगणा मध्ये सातत्याने दुर्गा सप्तशती,सामुदायिक पाठवाचन, गावठाणातील श्री दत्त मंदिर येथे सामुदायिक गुरुचरित्र पारायण, तर गावातील महादेव मंदिरामध्ये दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला अभिषेक,विविध धार्मिक कार्यक्रम यासह दीपमाळ प्रज्वलित करणे असे छोटे मोठे भरपूर प्रमाणात कार्यक्रम ते करीत आहेत.  गणेश गोसावी यांच्या सारख्या निस्सीम श्री स्वामी समर्थ भक्ताचा जीवन संघर्ष व स्वामी सेवेतून झालेला जीवन उत्कर्ष इतरांसाठी नक्कीच आदर्शवत असा आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *