BREAKING NEWS
Search

जांबुत,शिरूर : जांबूतकरांना कुकडी कनॅलमधून आउटलेट द्वारें पाणी मिळावे म्हणून भीमाशंकर कारखान्याकडून ३० लाख रुपयांचा निधी देणार – दिलीप वळसे पाटील 

1201
       जांबुत,शिरू : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील जांबुत परिसरातून वाहणाऱ्या कुकडी नदीत नियमित पाणी मिळावे व त्या पाण्याचा परिसरातील वडनेर,माळवाडी,शरदवाडी,टाकळी हाजी परिसरातील शेतीला व नागरिकांना कायमस्वरूपी उपयोग व्हावा म्हणून चोंभूत येथून वाहणाऱ्या कुकडी कॅनालवर आउटलेट तयार करण्याकामी व ते पाणी या आऊटलेट द्वारे म्हस्केवाडी ओढ्याद्वारे जांबुत येथील कुकडीनदीवरील बंधाऱ्यात कसे पोहचेल व त्यातून या परिसरातील पाण्याची समस्या लवकरात लवकर सुटली जावी म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या कामासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते नुकतेच जांबुत ता.शिरूर येथील विविध विकासकामांचा प्रारंभ व उदघाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
  यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता गावडे,भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम,संचालक,प्रदीपदादा वळसे पाटील,सभापती विश्वासआबा कोहकडे,घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर-आंबेगाव अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील,युवक अध्यक्ष अमोल जगताप व अनेक गावचे सरपंच,पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
       कुकडी नदीवर अवलंबून असणाऱ्या या परिसरातील गावातील पाण्याची समस्या लक्षात घेत जवळून वाहणाऱ्या कुकडी नदीत चोंभूत ता.पारनेर जवळील कॅनाल मधून पाणी जांबुत बंधाऱ्यात आणल्यास या भागातील जांबुत व इतर गावांचा पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लागणार आहे. त्या दृष्टीनें भीमाशंकर कारखान्याने या कामी पुढाकार घेत ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून प्रखर्षाने प्रयत्न सुरु असून लवकरच हे काम मान्यता मिळून मार्गी लागेल असा विश्वास आमदार वळसे पाटील यांनी जांबुत व परिसरातील  उपस्थित ग्रामस्थांना दिला. सरपंच डॉ. जयश्री जगताप, माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया,बाळासाहेब पठारे,वासुदेव जोरी व ग्रामस्थांनी वळसे पाटील यांच्या या घोषणेचे जोरदार स्वागत करीत जांबुत व परिसरातील कुकडी नदीवर अवलंबून असणाऱ्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली. तर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून मूळ जांबुत गावचे रहिवासी असलेले पुण्याचे उप जिल्हाधिकारी तथा राज्य ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी देखील प्रशासकीय पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच हा पाण्याचा प्रश्न सुटला जाईल अशी आशा परिसरातील नागरिक,शेतकरी,महिला वर्गातून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *