पिंपरी पेंढार,जुन्नर : (रिपोर्ट,अशोक डेरे) – उंब्रज नंबर एक (सोंडेवाडी) ता. जुन्नर येथील मधुकर रामचंद्र हांडे यांच्या पाच वर्षे वयाच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.बिबट्या प्रवनक्षेत्र असलेला जुन्नर तालुका आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नेहमीच बिबट्याच्या दहशतीखाली असलेला उंब्रज, काळवाडी, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी या परिसरात कायमच बिबट्यांचे हल्ले होत असतात. अशाच हल्ल्यात मंगळवार दि 24 रोजी पहाटेच्या सुमारास मधुकर हांडे यांच्या गोठ्यात असलेल्या पाच वर्षे वयाच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून शेळी ठार करून बाजूलाच असलेल्या केळीच्या शेतात नेऊन फस्त केली. सदर या घटनेनंतर वनखात्याचे कर्मचारी व अधिकारी एस के साळुंके, इ. पी. विभुते, बी. के. खर्गे, सुरेश गायकर, यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
या परिसरात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे त्यामुळे त्यांचे अपघाती मृत्यूही होत आहेत. चार दिवसांपूर्वीच पिंपरी पेंढार येथील साईनगर शिवारातील राणबाबा मंदिराजवळ नगर कल्याण महामार्ग पार करत असताना अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाच्या एका नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात बिबट्याचा जागीच ठार झाला आहे. यापूर्वीही याच महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. तर पुणे-नाशिक महामार्गावर कांदळी गावच्या हद्दीत पण बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता.त्यामुळे बिबट्यांचे वारंवार अपघाती मृत्यू व त्यांचे होणारे हल्ले यावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची मागणी परिसरातली जनसामान्य नागरीकाकडून होत आहे.