BREAKING NEWS
Search

मुरबाड करांना दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करणार – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

365

जन आशीर्वाद यात्रेत मुरबाडकरांना आश्वासन

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड मध्ये आज केंद्रीय पंचायत राजराज्यमंत्री कपिल पाटील यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या सुचने नंतर पहिल्यांदा मुरबाड मतदार संघात आगमन झाले. कपिल पाटील हे मुरबाडकरांना परिचित असताना भारताच्या स्वातंत्र्यानंतर ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रात स्थान मिळाल्याने आज सर्वच मुरबाडकर पक्षभेद विसरून त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी होताना दिसले. यावेळी त्यांनी मुरबाडकरांच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून अश्वाशीत असलेली मुरबाड रेल्वे 2025 पर्यंत धावेल असे पुन्हा आश्वासन दिले. मुरबाडला रेल्वे येणारच असे आश्वासन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पुन्हा देऊन एक आशावाद तयार केला.
 भर पावसात मुरबाड येथे निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेस मुरबाड शहरातील लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्यांचेसोबत आमदार किसन कथोरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी आमदार दिगंबर विशे, कल्याण चे माजी आमदार नरेंद्र पवार, लियाकत शेख, तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव उपस्थित होते. संपूर्ण मुरबाड शहर कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी सजली होती. शहरातील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर, स्वातंत्र वीर हिराजी पाटील व त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत त्यांनी जनतेचे आभार मानले. राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड तालुक्यातील लोकांसाठी घोषणांचा पाऊस पाडला. मुरबाडसाठी रेल्वे, माळशेज घाटात वाहतुकीसाठी बोगदा, संपूर्ण भारतातील पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित व्हावे म्हणून पर्यटकांसाठी माळशेज घाटमाथ्यावर काचेचा स्कायवॉक तयार करण्यात येईल अशा घोषणा त्यांनी केल्या. तसेच भीमाशंकर अभयारण्यातील सिद्धगड येथील हुतात्मा स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यात येईल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुरबाड बाजार पेठेत लोकांचे पुष्पहार स्वीकारण्यासाठी भर पावसात अंगावर लोकांनी दिलेली शाल पांघरून केंद्रीय मंत्री कपिल पाटील पायी चालत होते. पावसाची तमा न बाळगता मुरबाड बाजार पेठेत पायी निघालेल्या कपिल पाटील यांचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. केंद्रात मंत्रीपद मिळून सुद्धा कपिल पाटील यांचे पाय जागेवरच असल्याची चर्चा लोकांमध्ये होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *