वीज बिल तक्रारी निवारण्यासाठी जुन्नर,आंबेगाव व खेड तालुक्यात शिबिरांचे आयोजन -खा.डॉ.अमोल कोल्हे 

406

   नारायणगाव,पुणे : (अतुल कांकरिया,सा.समाजशील वृत्तसेवा –  महावितरणच्या वीज बिलाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागाच्या वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जुन्नर,आंबेगाव व खेड तालुक्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
डॉ.कोल्हे यांच्या सूचनेनुसार महावितरणने शिरूर लोकसभा मतदारसंघात १ ते १० जुलै राजगुरुनगर , ५ जुलै मंंचर व राजगुरुनगर, ६ जुलै घोडेगाव व जुन्नर आणि ८ जुलै नारायणगाव व आळेफाटा आदी ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मार्च महिन्यापासून वीज ग्राहकांना सरासरी बिल आकारणी करण्यात येत होती. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने वीज वापरापोटी भरमसाठ बिलं पाठविल्याची तक्रार करायला ग्राहकांनी सुरुवात केली. डॉ. कोल्हे यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना पत्र पाठवून सुधारीत बिलं पाठविण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार आणि अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन वीज आकारणी बाबत माहिती दिली.
नागरिकांना दिलेली बिलं बरोबर असल्याचा दावा तालेवार आणि पवार यांनी केला. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होणे गरजेचे आहे असे सांगून ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करून तक्रार निवारण करा.  ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण केल्याशिवाय वीजपुरवठा खंडित करणे आदी कारवाई करु नये अशी सूचनाही डॉ. कोल्हे यांनी केली.या संदर्भात डॉ. कोल्हे यांनी नागरिकांनी वाढीव वीज बिलाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शिबिरात जाऊन खात्री करून घ्यावी. जर बिलात तफावत दिसत असेल तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना दाखवून देऊन बिलात सुधारणा करून घ्या असे आवाहन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *