मोजक्या उपस्थितांतच लग्नाचा कायदा करण्याची नागरिकांकडून अपेक्षा

458
रांजणगाव गणपती (-प्रतिनिधी, पोपट पाचंगे) : कोरोनामूळे सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे आणि अंत्यविधीसह अन्य कार्यक्रमांच्या उपस्थितीवर बंधने घालण्यात आली असून, सुरुवातीला लग्नासाठी ५० वऱ्हाडीना परवानगी दिली जात असताना आता मात्र प्रशासनाकडून मात्र अवघे २० वऱ्हाडींना परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला ही बाब स्वीकारणे कार्यमालकांना जड गेले, आता मात्र त्याची सवय झाली आहे. लग्न सोहळ्याचा हा नवीन फंडा सर्वत्र लोकप्रिय होत चालला असल्याने आत्तापुरताच नव्हे, तर उपस्थितीचा हा नियम यापुढेही कायम ठेवण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे. दरम्यान, लग्न सोहळे अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत व कमी खर्चात होत असल्याने यंदा लाखो रुपयांची बचत झाल्याचे दिसून आले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे २४ मार्चपासून देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले. मागील महिन्यांपासून त्यामध्ये शिथिलता असली तरी अजूनही गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने असल्याने मागील आठवड्यापासून लग्न सोहळ्याला व अंत्यविधीला फक्त २० वऱ्हाडींच उपस्थित राहू शकतात, तसा प्रशासनाकडून आदेशच काढण्यात आला आहे. या निर्णयाबाबत सुरुवातीला नाराजी व्यक्त करण्यात आली असली तरी आता मात्र लोकांना त्याची सवय झाली आहे. यामूळे बहुतांश वधू व वर पित्यांनी विवाह समारंभ उरकत घेतले त्यामूळे खर्चात लाखो रुपयांची बचत झाली. वऱ्हाडींची धावपळ कमी होऊन यजमान कुटुंबियांचा ताण अतिशय कमी झाला. लग्नानंतर होणाऱ्या वराती बंद झाल्याने लग्न समारंभावर होणारा खर्च थांबल्याने बहुतांश कार्यमालक समाधानी असल्याचे दिसून आले. तर काहींनी हे मुला मुलींचे लग्न धूमधडाक्यात करायची असल्याने विवाह समारंभ पुढे ढकल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला अतिशय जड गेलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची लोकांना आता सवय झाली आहे. हा निर्णय नागरिकांना आवडू लागल्याने सरकारने हा नियम कायमस्वरूपी ठेऊन कायदा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    याबाबत नुकतेच लग्न झालेले खंडाळे, ता. शिरुर येथील नवरदेव विशाल नरवडे म्हणाले कि, “कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे लग्न समारंभ मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून पार पडला. कमी वऱ्हाडी मंडळीत लग्न झाल्याचे निश्चितच समाधान आहे. लग्न समारंभासाठी आम्हाला व नातेवाईक यांना फार धावपळ करावी लागली नाही. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न संपन्न झाल्याने खर्चात मोठी बचत झाली, त्यामूळे वायफळ खर्च वाचला. उपस्थिती कितीही असो, लग्नात सप्तपदी व होमहवन यालाच विशेष महत्व आहे.”                                                                                          



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *