विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव ; चार इमारती सात दिवसांसाठी सील

327

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात कोरोनाने शिरकाव केला. सेवक चाळीतील दोघांना ; तसेच एका अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठातील चार इमारती सात दिवसांसाठी सील केल्या आहेत. दरम्यान, विद्यापीठात कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय येऊ नये, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आतापर्यंत विद्यापीठाचे शैक्षणिक संकुल कोरोनामुक्त होते. मात्र, शहरातील वाढती कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चिंतेचा विषय झाला असून, त्याचा फटका विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात राहणार्‍या सेवक व कर्मचारी यांना बसला आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात सेवक चाळीत राहणार्‍या दोघांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर प्रशासनातील एका अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या सर्वांच्या संपर्कात आलेल्या, व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, विद्यापीठ प्रशासनाने सेवक चाळीतील चार इमारती सील करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक, अधिकारी यांनी अधिकाधिक ऑनलाइन पद्धतीने काम करण्यावर काही दिवस भर द्यावा. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही विद्यापीठाच्या परिसरात येऊ नये, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नव्याने उभारलेल्या स्पोर्ट्स ऑडिटोरियममध्ये कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरमध्ये 300 बेड्सची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर आणि परिचारिकांची राहण्याची सुविधा नव्याने बांधलेल्या इमारतीत करण्यात आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *