माळीण  दुर्घटनेला गुरुवार ३० जुलै २०२० ला सहा वर्षे पुर्ण – दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्या 

725
         घोडेगाव ता.आंबेगाव  :  (प्रतिनिधी,सीताराम काळे) –  आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात ३० जुलै २०१४ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगरला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा गावाच्या दिशेने वेगाने आला. डोंगरावरची झाडे भिंगरी सारखी उडत खाली आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात संपुर्ण गावच ढिगा-याखाली गाडले गेले. अन् १५१ लोक मृत्युमूखी पडले. या दुर्घटनेला ३० जुलै २०२० रोजी सहा वर्षे पुर्ण झाली असली तरी येथील नागरिकांच्या डोळयात आजही त्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या आहेत.
       सहयाद्रीच्या पर्वत रांगांत पश्चिम आदिवासी भागात डोंगरद-यांच्या कुशीत वसलेले माळीण गाव पोटेवाडी, उंडेवाडी, चिंचेवाडी, पसारवाडी, कोकणेवाडी, लेंभेवाडी, झांझरेवाडी या वाडयावस्त्यांसह सुमारे ६९२ लोकसंख्या असलेले गाव यात माळीण गावठाणात २३२ लोकसंख्या. पूर्वीपासून आदिवासी भागातील सर्वात जास्त साक्षर म्हणून माळीण गावाची ओळख. सन १९६२ मध्ये साक्षर पुरस्काराने गौरविण्यात आलेले गाव गुण्यागोविंदयाने हसत खेळत लहान थोरांची मिळून मिसळून असणारी माणसे विविध सण, पारंपारिक आदिवासी वेशभुशा संस्कृती पध्दतीने साजरे केले जात असत. परंतु दि. ३० जुलै रोजी हिमत्स्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत माळीण गावठाणातील १५१ लोक ढिगा-याखाली गाडले गेले.
         आमडे गावच्या हद्दीत ८ एकर जागेवर माळीण ग्रामस्थांना हक्काच्या घरांसाठी नवीन गावठाण उभारण्यात आले. या पुनर्वसन जागेत ६७ घरे बांधण्यात आली. अन् १८ प्रकारच्या नागरिसुविधा देण्यात आल्या. तसेच या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले होते. त्या ठिकाणी स्मृतिस्तंभ उभारले गेले. त्यावर प्रत्येक मृत व्यक्तिचे नाव टाकले. तेथे १५१ स्मृती वृक्ष लावले अन प्रत्येक झाडाला त्या मृत व्यक्तिचे नाव दिले. माळीण रस्त्याच्या कडेला, मोकळया जागेत, स्मृतीवनाच्या भोवती वृक्षलागवड केली. अन् स्मृतिवनाच्या कडेने तारेचे कुंपन करण्यात आले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व राज्यातील विविध खात्यातील मंत्री आदि मान्यवरांच्या हस्ते दि. १ एप्रिल २०१७ रोजी माळीण ग्रामस्थांच्या घरांचा लोकापर्णन सोहळा संपन्न झाला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *