श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर  

कोरोनाच्या महामारीमुळे भीमाशंकर मंदिर बंद,श्रावणी यात्रा होणार नसल्याने भाविकांना भीमाशंकराचे दर्शन दुर्लभ

574
              घोडेगाव,ता.आंबेगाव : (प्रतिनिधी, सिताराम काळे)  – आंबेगाव तालुक्यात श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. पुर्ण एक महिना दर्शनासाठी भाविकांची येथे गर्दी असते. या यात्रेचे नियोजन भीमाशंकर देवस्थान व प्रशासन करत असते. यावर्षी दि. २१ जुलैपासुन श्रावण महिना चालु झाला आहे. मात्र कोविडमुळे मंदिर बंद असल्याने श्रावण महिन्यात दर्शनासाठी कोणी येऊ नये असे देवस्थानने यापूर्वीच जाहिर केले आहे.
              आंबेगाव व खेड तालुक्याच्या हद्दीवर सहयाद्रीच्या कुशीत हिरव्यागार वृक्षांनी वेढलेल्या जंगलात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर वसलेले आहे. बारा ज्योतिर्लिगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराची रचना हेमाडपंती शैलीचे असून कोरीव काळया दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले आहे. भीमाशंकर ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळत असल्याने हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणून लोकांना आकर्षित करते. भिमाशंकरमधून भीमा नदीचा उगम झाला आहे. १३० चौरस किलोमिटरमध्ये पसरलेले घनदाट सदाहरित हिरवेगार भीमाशंकर अभयारण्य येथे आहे. या अभयारण्यात शेकरू नावाची मोठी खार आढळते. तसेच जंगली प्राणी, पशू-पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आढळतात.
              भीमाशंकर मंदीर व अभयारण्य परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे आहेत. यामध्ये पाय-यांच्या सुरूवातीला असलेले कळमजाई देवीचे मंदिर, मंदिराबाहेर असलेली पोर्तुगीज काळातील घंटा, घंटेला लागून असलेले शनिमंदीर, मंदिराजवळचे गोरक्षनाथ मंदिर ही प्राचिन मंदिरे आहेत. तर मंदिराच्या पुढे जंगलात गुप्त भीमाशंकर, साक्षीविनायकांचे मंदिर आहे. तसेच भीमाशंकर अभयारण्यात हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनीमातेचे मंदिर आहे. या परिसरात श्रावण महिन्यात अनेक भाविक दर्शनासाठी जातात.
पावसाळयात मुंबई व उपनगरांतील धाडसी पर्यटक व गिर्यारोहक खांडस, पदरमार्गे शिडी अथवा बैलघाटाने भीमाशंकरमध्ये येत असतात. ही वाट शिवकालीन असून या रस्त्याने भीमाशंकरकडे येणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे मंदिर बंद असल्याने श्रावणी यात्रा होणार नसल्याने भाविकांना भीमाशंकरचे दर्शन होणार नाही. तसेच पावसाळी पर्यटकांसाठी भीमाशंकर मध्ये येता येणार नाही.  आल्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *