( संग्रहित छायाचित्र )

तुळजापूरला पलंग घेऊन जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत

833

घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : मराठवाडयात असणारी कुलस्वामी तुळजापुरमध्ये जो पलंग जातो तो घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील श्री शनिमंदिरात तयार केला जातो. या पंलगाचे वास्तव्य साधारण दहा दिवस असते. पलंग तुळजापुरला पाठविण्याची परंपरा यादव काळापासुनची आहे. मात्र यावर्षी कोरानाच्या संकटामुळे हा सोहळा रद्द झाल्याने मागील शेकडो वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे.


तुळजाभवानी मातेच्या जयघोषात भाविक भक्तांच्या डोक्यावर, तर कधी हातावर उचलून पलंगाचा पायी प्रवास केला जातो. हा पलंग श्रावण वद्य सप्तमीपासुन भाद्रपद शुध्द पंचमीपर्यंत घोडेगाव येथे मुक्कामी असतो. या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाद्रपद शुध्द पंचमीला घोडेगाव येथे पलंगाची मोठी मिरवणुक काढतात. नंतर तोच पलंग निमदरी, जुन्नर, कुमशेत, नारायणगाव, पारनेर, अळकुटी, नगर, जामखेड, भुम आलमार्गे विजयादशमीच्या दिवशी तुळजापुरमध्ये दाखल होतो. तुळजापुर येथे पलंगाची मिरवणुक व शिलंगणानंतर पलंगाच्या प्रवेशानंतर त्या ठिकाणी तुळजाभवानीची स्वयंभू मुर्ती पलंगावर विराजमान केली जाते. पलंगाची परंपरा जोपासण्याचे कार्य व या पलंगाची बांधणी करण्याचा मान घोडेगावचा तिळवण तेली समाजास आहे. तर पलंग तुळजापुरला नेण्याचे मानकरी अहमदनगर येथील पलंगे परिवाराकडे आहे. देवीचा पलंगाच्या लाकडावर कोरीव काम ठाकुर कुटुंब करत आहे. तर पलंगाचे सुटे भाग जोडण्याचा मान घोडेगाव येथील भागवत कुटुंबाकडे आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *