1 व 2 जानेवारी रोजी सिद्धगड येथे बलिदान दिना निमित्त आयोजित केले जाणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द लोकांनी सिद्धगड येथे न येता गावातच हुतात्म्यांना अभिवादन करावे सिद्धगड स्मारक समितीचे आवाहन  

540
          मुरबाड,ठाणे (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – ठाणे ,रायगड , पुणे जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगड बलिदान भूमीवर दरवर्षी 1 व 2 जानेवारी रोजी बलिदान दिना निमित्त आयोजित केले जाणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या साथी मुळे रद्द करण्यात आल्याचे सिद्धगड स्मारक समिती मुरबाड तर्फे जाहिर करण्यात आले आहे.
      भारतीय स्वातंत्र्य लढ्यात  2 जानेवारी 1943 रोजी हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेऊन दरवर्षी सिद्धगड येथे सिद्धगड स्मारक समिती विविध कार्यक्रम आयोजित करते. स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक , ठाणे व रायगड जिल्ह्यातील शाळांचे शिक्षक वर्ग , विद्यार्थी , मशाल ज्योती आणणारी मंडळे , कुस्ती स्पर्धक पैलवान ,व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावतात.
     यावर्षी कोरोनाच्य धोक्यामुळे शासनाने लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास बंदी घातली आहे. तसेच सिद्धगड येथे हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी ज्या ठिकाणी हुतात्मा ज्योत प्रज्वलित केली जाते त्या ठिकाणी लोकांना सुरक्षित अंतर ठेऊन उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही हे लक्षात घेऊन सिद्धगड येथे ता 1 व 2 जानेवारी 2021 रोजी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले नाहीत अशी माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी दिली.
     सिद्धगड येथे  2 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजून 10  मिनिटांनी फक्त मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. त्यामुळे सिद्धगड येथे लोकांनी उपस्थित राहू नये सर्व देशप्रेमी नागरिकांनी आपल्या घरी किंवा गावात जेथे स्वातंत्र्य लढ्यातील स्मारक आहे तेथे पहाटे 6 वाजून10 मिनिटांनी सिद्धगड रणसंग्रामात आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करावे असे आवाहन पवार यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *