टेक्नोक्राफ्ट कंपनीतील कामगारांच्या कायम पाठीशी राहू – खासदार कपिल पाटील यांचे कामगारांना आश्वासन

479

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड धानिवली टेक्नोक्राफ्ट कंपनीतील 54 स्थानिक कामगाराच्या आपण कायम पाठीशी राहू, असे आश्वासन भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी उपोषण कर्त्यांना दिले. मुरबाड तालुक्यातील धानिवली येथे असलेल्या टेक्नोक्राफ्ट कंपनीतील 54 कायम कामगारांना लॉकडाऊनच्या काळात सेवेतून कमी करण्यात आले. यासंदर्भात  कामगारांनी न्यायालयीन लढा देण्याबरोबरच बेमुदत आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी 13 व्या दिवशी भेट दिली. तसेच कामगारांशी संवाद साधला. टेक्नोक्राफ्ट कामगारांच्या आपण पाठीशी उभे राहणार असून, या कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर सरकारी यंत्रणांबरोबर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. या कंपनीतील  प्रत्येक कामगाराला न्याय मिळेपर्यंत आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार कपिल पाटील यांनी दिले. टेक्नोक्राफ्ट  उद्योगसमूहाच्या मुरबाडमध्ये आणखी कंपन्या आहेत. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबतही कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन खासदार कपिल पाटील यांनी दिले. या वेळी  भूषण भोईर, दीपक खाटेघरे आदी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *