मुरबाड जवळील चीलार वाडी मधील आदिवासी पन्नास वर्षे रस्त्याच्या प्रतीक्षेत

639
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील चिलार वाडीतील अदिवासी पन्नास वर्षे रस्त्याची प्रतीक्षा करत असून, दरवर्षी पावसाळ्यात चिखल माती तुडवत ये जा करणाऱ्या या वाडीतील आदिवासींना रस्ता कधी मिळणार? याची चिंता पडली आहे. मुरबाड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवली गावा पासून, चीलार वाडी येथे जाण्यासाठी फक्त एक किलोमीटर पेक्षा कमी अंतराच्या रस्त्याची गरज असतानाही तेथे जाण्यासाठी शासनाने अद्याप रस्ताच तयार केलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे मे 2020 मध्ये मुरबाड पंचायत समिती मार्फत रोजगार हमी योजने अंतर्गत ( एम आर ई जी एस ) अंतर्गत पाचशे मीटर रस्त्याचे खडीकरण करण्यास निधी मंजुर झाला. पण दहा महिने होत आले तरी या रस्त्यावर एक दगड सुद्धा पडला नाही. असे उघडकीस आले आहे.
1972 साली शिरवली गावा जवळ धरण बांधले या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडाल्याने शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेली खोंड्याची वाडी विस्थापित झाली आहे. काही लोक तळ्याची वाडी मध्ये गेले, तर काही लोक धरणाच्या पूर्व बाजूस राहायला गेले. त्याचे नाव खोंड्याची वाडी, तर धरणाच्या बांधा जवळ काही लोक येऊन राहिले त्याचे नाव चीलर वाडी असे झाले. सर्व वस्ती आदिवासी ठाकूर समाजाची उन्हाळ्यात माळ रानातून वाट काढत व खड्डे चुकवत कशी तरी मोटार सायकल वाडी मध्ये जाते. काही लोक धरणाच्या बांधावरून ये जा करतात. पण पावसाळ्यात मात्र अतिशय त्रास होतो. आजारी लोकांना मुरबाड येथे जाण्यासाठी यातना सोसाव्या लागतात. शिरवली ते चीलार वाडी हे अंतर एक किलमीटरच्या आत आहे. तीन वेळा रस्ता मंजूर झाला. त्या कामाचे नारळ देखील फोडले. पण काम सुरू झालेच नाही. आता सुद्धा खडीचा का असेना रस्ता मंजूर झाला आहे. मात्र त्याचे काम सुद्धा सुरू होत नसल्याने गावकरी  हवालदिलं झाले आहेत.
 याबाबत जानू वाघ, ग्रामस्थ चीलर वाडी यांनी सांगितले की, ” राजकीय नेत्यांना वेळोवेळी आमच्या वाडीला रस्ता करा म्हणून आम्ही विनंती करतो आणि त्यांच्याकडून रस्ता होईल असे आश्वासन ही दिले जाते. पण अजुन रस्ता झाला नाही. गेली पन्नास वर्षे आम्ही येथे राहतो. पावसाळ्यात बाजार करण्यासाठी, रेशन दुकानात जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागतो.”
तर यावर बोलताना गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड रमेश अवचार यांनी सांगितले की, ” शिरवली चिलार वाडी पाचशे मीटर रस्त्याचे खडी करण करण्यासाठी ( एम आर ई जी एस) रोजगार हमी योजने अंतर्गत सहा लाख वीस हजार रुपये निधी मंजुर केला आहे. त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश देतो.”  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *