आळंदीतील ताटी उघडा ज्ञानेश्वरा संस्थेस शिरूर तालुक्यातील महाराष्ट्र वारकरी मंडळाचा मदतीचा हात – तेथील गरजू वारकऱ्यांना किराणा साहित्य भेट 

739

आळंदीतील ताटी उघडा ज्ञानेश्वरा संस्थेसशिरूर तालुक्यातील महाराष्ट्र वारकरी मंडळाचा मदतीचा हात – तेथील गरजू वारकऱ्यांना किराणा साहित्य भेट 

  शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजी- रोटीचा गंभीर प्रश्न उभा राहिलेला असताना पुणे जिल्ह्यातील गरजू व गरीब वारकऱ्यांना मदत व्हावी या हेतूने महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश महाराज काळजे यांनी प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांना आदेश देऊन तालुक्यातून निधी गोळा करून गरजू वारकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

त्या अनुषंगाने शिरूर तालुका वारकरी महामंडळाच्या वतीने उदार दानशूर भक्तांकडून जमा झालेल्या दहा हजार रुपयांच्या निधीतून किराणामालाचे १० किट आळंदी येथे जाऊन ताटी उघडा ज्ञानेश्वरा या संस्थेतील वारकरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. एकमेका सहाय करू ! अवघे धरू सुपंथ ! या काव्य पंक्तींचा प्रत्यय आला. कोरोनाच्या या भयावह काळात आता खऱ्या अर्थाने एकमेकांना मानसिक,सामाजिक,आर्थिक मदतीचा हात देत मनापासून सामाजिकता जपण्याची नितांत गरज असल्याचे मत राज्य बळीराजा संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष सोनभाऊ मुसळे यांनी व्यक्त केले आहे. तर तालुका वारकरी मंडळाने राबविलेल्या या स्तुत्य व विधायक उपक्रमाचे मुसळे यांनी कौतुक ही केले आहे.यावेळी आळंदी येथे शिरूर तालुका वारकरी महामंडळाचे संघटक आणि मार्गदर्शक शिवाजी महाराज कांदळकर, भाऊसाहेब महाराज कांदळकर,रघुनाथ महाराज कांदळकर, भजन मंडळाचे अधक्ष केरभाऊ महाराज शितोळे यांच्या उपस्थितीत संस्थेतील  विद्यार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, चा जयघोष करीत कोरोनाचे संकट लवकर दुर होवो अशी प्रार्थना परमेश्वराकडे करण्यात आली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *