राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पुरग्रस्थांना होणार मदत – शरद पवार

329
मुंबई (समाजशील वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील सहा ते सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली. या आपत्तीच्या काळात पूरबाधितांच्या मदतीसाठी तातडीने उभे राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने घेतला असून, ट्रस्टकडून करण्यात येणाऱ्या मदतीची रूपरेषा शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केली.
महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीच्या काही भागात घरांचे नुकसान आणि अन्य नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्य या संकटाच्या काळात पूरग्रस्तांच्या सोबत आहे. हे जिल्हे सोडल्यास राज्याच्या उर्वरीत भागात अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. मात्र या सहा जिल्ह्यांमध्ये झालेले नुकसान प्रचंड आहे. त्यामुळे तिथे तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे.
पत्रकार परिषदेत पवार म्हणाले कि,”आमच्याकडे आलेल्या आकडेवारीनुसार सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजार घरे पुरामुळे बाधित झाली आहेत. या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जीवनावश्यक वस्तूंचे १६ हजार कीट्स पाठविण्यात येणार आहेत. यात घरगुती भांडी, पांघरुण साहित्य, खाण्याच्या वस्तू यांचा समावेश असणार आहे. तसेच पुरानंतर उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करून २५० डॉक्टरांची पथके बाधित गावांमध्ये कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधांचे वाटप करणार आहेत. तसेच १ लाख कोरोना प्रतिबंधक मास्कचा पुरवठा ट्रस्टकडून केला जाणार आहे.”
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पूरग्रस्त भागासाठी पाच रुग्णवाहिका दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांची २५० डॉक्टरांची टीम ही पूरग्रस्त भागातील गावात जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करणार आहे. सौम्य आजार असलेल्या लोकांना औषधे दिली जाणार आहेत. तर गंभीर आजाराच्या रुग्णांना सरकारी रुग्णालयात भरती केले जाणार आहे. ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष जग्गनाथ शिंदे हे पूरग्रस्त भागाला औषधे पुरविण्याचे काम करणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी बिस्किट आणि टोस्ट याचे वीस हजार किट्स ब्रिटानिया आणि इतर कंपन्याकडून एकत्र करून त्याचे वाटप केले जाणार आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या या मदतीची किंमत अडीच कोटींच्या आसपास असून, याशिवाय जिल्हा पातळीवर देखील पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपापल्यापरिने मदत करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *