अभिनयसम्राट कै.रामचंद्र बनसोडे करवडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कै. गुलाब बोरगावकर कुटुंबियांकडून विनम्र अभिवादन

304
         सातारा : (सा.समाजशील वृत्तसेवा) –  तमाशा क्षेत्रातील अभिनयसम्राट कै.रामचंद्र बनसोडे करवडीकर यांची पुण्यतिथी नुकतीच संपन्न झाली. त्या निमित्त विनोदसम्राट कै. गुलाब बोरगावकर कुटुंबियांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रात कराड हे तमाशा व्यवसायाचे मुख्य केंद्र. अनेक नामांकित तमाशा फडांना अर्थ पुरवठा असो अथवा नव्या तमाशा फडाची बांधणी असो कराडला तितकेच महत्त्व.१९७०  अनेक लोकनाट्य तमाशा फड कराडला चांगला व्यवसाय करीत होते. या तमाशा फडातल्या बहुतांश नाच्या स्त्री कलावंत याही कराडच्या. त्यामुळे कराडला महत्त्व आहे.
अलीकडे कराड जवळचे कै. रामचंद्र बनसोडे करवडीकर यांनी तमाशा व्यवसायात उत्तम नाव कमविले. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले रामचंद्र बनसोडे हे एकदम भारदस्त व्यक्तिमत्व. घरची परिस्थिती बेताची असताना ओगलेवाडी येथील डेलस्टार प्रा.लिमिटेड कंपणीत १९७० पूर्वी कामाला होते. त्याठिकाणी बोरगावकर यांचे  कराडजवळच्या वनवासमाची येथील  आतेभाऊ शौकत भाई भालदार व निजाम भाई भालदार हे ही कामास होते. रामचंद्र बनसोडे आणि त्यांची चांगली मैत्री होती. त्यावेळी फावल्या वेळेत बनसोडे गावातील नाटकात काम करीत असत. त्यांना कलेची आवड इतकी होती की, आपण तमाशा क्षेत्रात नाव कमवावे असे त्यांना वाटे. त्यावेळी या मित्रांसोबत ते चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडीक पुणेकर यांचा तमाशा पहायला जात. हा तमाशा फड राज्यात त्यावेळी गाजत होता. विनोद मूर्ती म्हणून गुलाबराव बोरगावकर हे प्रसिद्ध होते. आतेभाऊंच्यामुळे रामचंद्र बनसोडे आणि गुलाब मामांचा परिचय झाला. काही दिवस सहवास लाभल्यानंतर बनसोडे यांनी तमाशात काम करण्याची इच्छा गुलाब मामाच्याकडे बोलून दाखविली. पण आम्ही करतो ते पुष्कळ आहे. या तमाशा व्यवसायात तरूणांनी येऊ नये. नोकरी करावी असे त्यांना वाटत असावे त्यामुळे बनसोडे यांना आपल्या तमाशात घेण्यासाठी टाळाटाळ केली. पण रामचंद्र बनसोडे हाडाचे कलाकार असल्याने त्यांच्यातील कला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
त्यावेळी विठाबाई नारायणगावकर त्यांचा ही तमाशा जोरात चालू होता. बनसोडे यांनी कशाचाही विचार न करता विठाबाई यांच्या तमाशात प्रवेश केला. नाटकातील कामाची सवय असल्याने त्यांनी या तमाशात वगात काम करून आपला चांगलाच जम बसविला. काही कालावधीनंतर विठाबाई यांची जेष्ठ सुकन्या मंगलताई यांच्याशी त्यांचे लग्न झाले.
त्यानंतर १९८२ साली गणपत व्ही. माने चिंचणीकर यांच्या बरोबर मंगलताई बनसोडे यांची एक वर्ष पार्टी निघाली. त्यानंतर पुढे मंगला बनसोडे करवडीकर अशी स्वतंत्र तमाशा पार्टी सुरू झाली  आणि पुढे जोर धरला. तसे पाहता रामचंद्र बनसोडे हे उत्तम  वगनाट्य लेखक होते. त्यावेळी ‘कृष्णाकाठचा ढाण्यावाघ’ अर्थात ‘बापू बिरु वाटेगावकर’ व ‘विष्णु बाळा पाटील’ अशी वगनाट्ये त्यांनी लिहिली. ती अतिशय गाजली आणि त्यातील  त्यांच्या भूमिकाही फार गाजल्या. तसे पहाता रामचंद्र बनसोडे हाडाचे शेतकरी. शेतीची आवड असल्याने शेतीकडे ही त्यांचे लक्ष होते. तर शर्यतीचे बैल संभाळणे हाही त्यांचा नाद लक्षणीय होता.
आज मंगला बनसोडे करवडीकर व नितीन बनसोडे अशी तमाशा पार्टी महाराष्ट्रभर गाजते आहे. त्यांचा दुसरा मुलगा अनिल लाईट व साऊड सिस्टिम व्यवस्था पाहतो. मंगलताई आज या वयातही आपल्या मुलांच्या पाठिशी जिद्दीने उभ्या राहून तमाशा फड चालवित आहेत. महाराष्ट्रातला एक नामांकित तमाशा म्हणून त्यांच्या पार्टीला ओळखले जाते. त्यावेळी रामचंद्र बनसोडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. यानिमित्ताने कै.रामचंद्र बनसोडे करवडीकर यांना कै. गुलाबराव बोरगावकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने पापा भाई बोरगांवकर, मुबारक बोरगांवकर यांची भावपूर्ण आदरांजली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *