शिवाई ई बसचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

262

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : पुण्यातील शंकर शेठ रोड येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रीक बसचा (शिवाई) लोकार्पण  सोहळा पार पडला. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर नगर मध्ये एसटी बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते लोकार्पण झाला. पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परीवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते शिवाई ई बसचे आणि पहिल्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे, आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून, महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच, गुणवत्ता वाढीसाठी आणि नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणे हे एसटीचे ध्येय आहे. याच उद्दिष्टावर आधारीत प्रदूषण विरहीत, आवाज विरहीत ‘शिवाई’ बस आहे. नागरिकांनी निश्चितपणे या बससेवेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांना एसटीची सेवा आपली वाटली पाहिजे यासाठी सर्व सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नजिकच्या काळात प्रत्येक आगारात विद्युत प्रभारक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकार त्यासाठी आवश्यक सहकार्य करीत आहे, असे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मनोरंजनासाठी वायफाय – शिवाई बसमध्ये वायफाय यंत्रणा देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी याचा उपयोग होईल, असे सांगून राज्य परीवहन महामंडळाच्या ७४ वर्षांच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी यांना उपमुख्यमंत्री यांनी धन्यवाद दिले. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी शासन सर्वांच्या बरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.नव्या सुविधा देऊन महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न – एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे. गेल्या वर्षात शासनाने २ हजार ६०० कोटींची मदत केली. एसटीला समस्येतून बाहेर काढण्यासाठी कायमचा उपाय शोधण्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात येत आहेत. फायदेशीर मार्गावर येणारा महसूल अन्य मार्गावर वळविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी लागेल. नव्या सुविधा देऊन महसूल वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले. विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या शिवाई बसची वैशिष्ट्ये – शिवाई बस विद्युतवर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलीत व आवाज विरहित आहे. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकुलीत लिव्हर बसविण्यात आले आहे व त्या सोबत वाचण्यासाठी स्वतंत्र दिवा देण्यात आला आहे. ही बस १२ मीटर लांबीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली असून, तिची रुंदी २.६ मीटर व उंची ३.६ मीटर आहे. सांगाड्याच्या खालच्या बाजूस बसच्या मधोमध प्रशस्त असा सामान कक्ष देण्यात आला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *