कवठे येमाईत कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी 

189
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे गावठाणात मध्यवस्तीत पहिल्या मजल्यावर असणाऱ्या कॅनरा बँकेचे एटीएम मशीन चोरटयांनी गुरुवारी दि. १५ ला रात्री साडेबारा ते दोनच्या दरम्यान कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. पण एटीएम मशीन मजबूत असल्याने चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
              दरम्यान आज दि. १६ ला सकाळी बँकेचे अधिकारी,कर्मचारी बँकेत आले असताना ही घटना उघडकीस आली. शाखा व्यवस्थापक प्रज्ञा पवार यांनी तात्काळ ही माहिती शिरूर पोलीस स्टेशन व आपल्या वरिष्ठ कार्यालयास कळवली. घटनेचे गांभीर्य व माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर,पोलीस नाईक धनंजय थेऊरकर,पोलीस कॉन्स्टेबल सुरेश नागलोथ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
               पोलिसांनी तात्काळ फोडण्याचा प्रयत्न झालेल्या एटीएम मशीनची पाहणी करीत बँकेतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार चोरटे असण्याची व ते कारमधून आल्याची शक्यता वर्तविण्यात आली.कवठे गावठाणातील मुख्य बाजारपेठेतील हनुमान मंदिरा नजीक असलेल्या कॅनरा बँकेचे एटीएम मशीन चोरटयांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती गावात समजताच एकच खळबळ उडाली. चोरटयांना मशीनचा कॅश बॉक्स कापता न आल्याने त्यातील रक्कम चोरीचा अनर्थ टळला आहे.
                गावात ग्राम सुरक्षा दल तात्काळ सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असून नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज असल्याचे सपोनि अमोल पन्हाळकर यांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *