जैविक साखळीचे जतन करणे काळाची गरज -डॉ.संतोष लगड

266
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा -हास जैविक साखळीस धोकादायक असून वेळीच या गंभीर समस्येकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक डॉ. संतोष लगड यांनी केले. तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील भूगोल विभागाने आयोजित केलेल्या जागतिक ओझोन दिन व निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. लगड बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळ व पुणे येथील विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक नवले, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. रविंद्र भगत, डॉ.पराग चौधरी आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. लगड पुढे म्हणाले की, ” दिवसेंदिवस बदलत जाणा-या मानवी जीवन शैलीमुळे कळत नकळत पर्यावरण साखळीकडे दुर्लक्ष होत आहे. जैवविविधतेला निर्माण झालेला गंभीर धोका आपल्याला रोखावाच लागणार आहे. आजच्या ओझोन दिनाचे औचित्य साधून प्रत्येक युवकाने पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याची शपथ घेणे काळाची गरज असल्याचेही डॉ. लगड यांनी सांगितले .
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना, महेशबापू ढमढेरे यांनी निसर्गाचे योग्य संतुलन राखण्याच्या गरजेवर भर दिला. जागतिक तापमान वाढ ही संपूर्ण जैविक साखळी उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरू शकते. त्या अनुषंगाने आपण सर्वानीच पर्यावरण संतुलन या बाबीकडे लक्ष देणे काळाची गरज असल्याचेही महेशबापू ढमढेरे यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. पर्यावरणपूरक उपक्रम वेळोवेळी राबविण्याच्या मुद्यावर त्यानी भर दिला. महाविद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांविषयीचा आढावा त्यानी यावेळी घेतला. भूगोल विभागप्रमुख डॉ. रविंद्र भगत यांनी आपल्या प्रास्ताविकात जागतिक ओझोन दिन तसेच निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या उपक्रम विषयीच्या अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या. डॉ. पद्माकर गोरे यांनी सुत्रसंचालन तर डॉ.संदीप सांगळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. मनोहर जमदाडे, डॉ. अमेय काळे, डॉ. विवेक खाबडे, प्रा. अविनाश नवले, प्रा. मिनाक्षी पोकळे याने विशेष परिश्रम घेतले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *