४ कोटी ६६ लाख रुपये खर्चाच्या माता भिमाईंच्या स्मारकाच्या कामाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमिपूजन

232

मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे येथे साकारणार जागतीक दर्जाचे भिमाई स्मारक

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : गेल्या अनेक वर्षात विविध कारणांनी लालफितीत अडकलेल्या माता भिमाई स्मारकाच्या कामाला गती मिळाली आहे. 4 कोटी 66 लाख 66 हजार रुपये खर्चाच्या पहिल्या टप्यातील कामाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री ना.डॉ. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शासकीय बांधकाम विभाग ठाणेचे कार्यकारी अभियंता शंकर तोटावार, सहायक आयुक्त समाजकल्याण ठाण्याचे समाधान इंगळे, मुरबाड विभाग उपअभियंता कैलास पतींगराव, शाखा अभियंता दिलीप चव्हाण, सूर्यभान आलटे इत्यादी उपस्थित होते.
 ” माता भिमाईंचे स्मारक हे जागतिक दर्जाचे होण्यासाठी मी प्रयत्नशील असून मुरबाडचे लोकं भाग्यवान आहेत, जेथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोळ आहे. ही पवित्रभूमी असून भिमाईंच्या स्मारकाच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही” असे या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आश्वासित केले. मुरबाड  तालुक्यातील आंबेटेंभे या गावात भारतीय संविधानाचे शिल्पकार ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाईंच्या स्मारकाचा प्रस्ताव अनेक वर्षे विविध कारणांनी शासन दरबारी धूळ खात पडला होता. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुरबाड 1 मध्ये उपविभागीय अभियंता कैलास पतींगराव यांनी कार्यभार हाती घेताच भिमाईंच्या स्मारकाच्या फाईली शासन दरबारी हलू लागल्या, त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने शेवटी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 4 कोटी 66 लाख रुपयांच्या खर्चाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला प्रशासकीय मान्यता मिळून तात्काळ स्मारकाच्या कामाला सुरुवात होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे माता भिमाईंचे भव्य स्मारक या ठिकाणी साकारणार असून ही जागतिक दर्जाची ऐतिहासिक वास्तू ठरणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे येथे माता भिमाई स्मारक संकुल बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. आंबेटेंभे हे मुरबाड पासून 15 कि.मी अंतरावर गाव आहे. हे ठिकाण महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई माता भीमाई यांचे माहेर होते. आंबेटेंभे गावात माता भिमाईचे लहान स्वरूपाचे स्मारक अस्तित्वात आहे. सदर जागेचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता या गावात भव्य स्वरूपाचे स्मारक बांधण्याचा निर्णय शासन स्तरावर झाला आहे.त्यानुसार या संदर्भात मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 03जून 2011रोजी दालनात बैठक झाली. बैठकीच्या वेळी मा. मुख्य सचिव यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि सरकरच्या निकडी नुसार मा. वास्तुशास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी साडे बारा एकर भूखंड क्षेत्र गृहीत धरून आराखडा तयार केला आहे. स्मारकाकरीता व रस्त्यांसाठी लागणारी जमीन वन विभागाकडून मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहा्य विभाग, शासन निर्णय क्रमांक सा न्या वी २०१८/प्र. क्र.१४४/ दिनांक ०३/०८/२०१८ अन्वये रू.४.६६.६६.०००/- इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. सदरचे काम ठेव अंशदान योजनेतून करण्यात येणार आहे.सदरच्या कामात मा. मुख्य अभियंता सा. बां. प्रादेशिक विभाग कोकण, मुंबई यांनी त्यांचे पत्र जा क्र.  अन्वये रू ४६३.०३ लक्ष इतक्या रक्कमेस तांत्रिक मान्यता दिली आहे.पहिल्या टप्प्यातील भिमाईंच्या स्मारकाचे खालील कामे होणार आहेत.
१) स्मारकाचे आर.सी.सी.बांधकाम
२) अंतर्गत रस्ते
३) जोडरस्ता
४) मुख्य गेट
५) प्लॉट डिˈव्हेलप्मन्ट् व रेटेनिंग वॉल.
६) वायर फेन्सिंग
७) पाणी पुरवठा
८)विद्युतीकरण
ही कामे तात्काळ सुरू करून विहित मुदतीत पूर्ण करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सा.बा उपविभाग मुरबाडचे कैलास पतींगराव यांनी  माहिती देताना सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *