शेकडो वयोवृद्धांचा एकमुखी निर्धार लढणार आणि सन्मान वेतन मिळवणार ; दरमहा दहा हजार रूपये सन्मान वेतनाची मागणी

242
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या शेकडो वयोवृद्धांच्या,लढणार आणि सन्मान वेतन मिळवणार अशा एकमुखी निर्धाराने 1 मे या महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी आयोजित करण्यात आलेला वयोवृद्ध सन्मान वेतन मेळावा संपन्न झाला. राज्यातील प्रत्येक गरजू वयोवृद्ध व्यक्तीला राज्य सरकारतर्फे दरमहा दहा हजार रुपये सन्मान वेतन म्हणून दिले जावेत त्यासाठी राज्य सरकारने वयोवृद्ध सन्मान वेतन कायदा करावा.या मागणीसाठी जनता दल ( सेक्युलर ),महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियन आणि वयोवृद्ध सन्मान वेतन संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्विनी भवन,बेलवली बदलापूर येथे ठाणे जिल्हास्तरीय भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेकडो तरुण, वयोवृद्ध आणि कष्टकरी स्त्रिया, घर कामगार महिला सामील झाल्या होत्या.
जनता दलाचे रवि भिलाणे, महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियनच्या संजीवनी नांगरे, जनता दलाच्या मुंबई महासचिव ज्योतिताई बडेकर, बदलापूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पगारे हे या मेळाव्याचे निमंत्रक होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नारी अत्याचार विरोधी मंचच्या सुजाता गोठोस्कर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या.त्यांनी वयोवृद्धांच्या सन्मान वेतन कायद्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
              जनता दलाचे प्रभारी अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यावेळी म्हणाले की जनता दलाने शेतकरी पेन्शनसाठी या आधी लढा उभारला होता. तसाच लढा उभारून वयोवृद्धांच्या सन्मान वेतनाचा प्रश्न धसास लावला जाईल. देशाच्या वेगवेगळ्या भागात वयोवृद्ध, घर कामगार महिला यांना मोठ्या प्रमाणावर सुविधा दिल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारची उदासीन भूमिका बघून लाज वाटते.अशा शब्दात महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियनच्या अध्यक्षा मंगला बावस्कर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कष्टकरी घर कामगार युनियनच्या मधू बिरमोळे यांनी,घरेलू कामगार बोर्ड साठी जसे सातत्याने आंदोलन केले तसेच वयोवृद्धांसाठीही केले जाईल असा निर्धार व्यक्त केला.तर एआयआरएसओ चे अक्षय पाठक यांनी वयोवृद्धांची जागतिक चळवळ आणि भारतीय परिस्थिती याचा उत्तम आढावा घेतला.राष्ट्रीय घर कामगार चळवळीचे ज्ञानेश पाटील यांनी  वयोवृद्धांच्या सन्मान वेतनासाठी सरकारने कायदा करावा असा ठराव मांडला आणि उपस्थितांनी, लढणार … मिळवणार अशा जोरदार घोषणा देत ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. रवि भिलाणे यांनी संघर्षाचा पुढील कृती कार्यक्रम जाहीर करत मेळाव्याचा समारोप केला. संजीवनी नांगरे यांनी प्रास्ताविक केले. ज्योतिताई बडेकर आणि सुरेखा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका छाया ताई कोरेगावकर यांच्या संघर्ष गीत गायनाने मेळाव्याची सुरवात झाली. मेळाव्याच्या आयोजनात कष्टकरी वर्गासोबत कार्य करणाऱ्या अनेक पुरोगामी संस्था संघटना यांनी वयोवृद्ध सन्मान वेतन संयोजन समितीच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *