कवठे ग्रामपंचायतीवर डॉ.पोकळे यांचे वर्चस्व कायम – सरपंचपदी शोभा किसन हिलाळ यांची निवड

622
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) :‌ शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‌शोभा किसन हिलाळ यांची निवड झाली.शिरूर पंचायत समितीचे या गणाचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी येथील ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे.
माजी सरपंच सुनीता बबनराव पोकळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर खुल्या‌ महिला संवर्ग पदासाठी राखीव असलेल्या ‌या जागेसाठी काल सोमवारी निवडणूक पार पडली. यामध्ये ‌शोभा किसन हिलाळ व मीना बाळासाहेब डांगे या दोन सदस्यांचा अर्ज आल्याने या ‌ दोन सदस्यांमध्ये थेट निवडणूक झाली. या निवडणुकीत ‌१७ सदस्यांनी भाग घेतला. यामध्ये शोभा हिलाळ यांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मते मिळाली. माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे गटाच्या शोभा हिलाळ यांना विजयी घोषित करण्यात आले.
 निवडणूक अधिकारी म्हणून मलठण मंडल अधिकारी माधुरी बागले व कवठे तलाठी ललिता वाघमारे व ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी काम पाहिले. यावेळी शिरूर व टाकळी पोलीस स्टेशनकडुन बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माजी सरपंच सुनिता पोकळे, मंगल सांडभोर, उपसरपंच उत्तमराव जाधव, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, निखिल घोडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे, प्रवीण बाफना, रामदास ईचके, सुभाष उघडे, राजेंद्र ईचके, ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी, वर्षा बोराडे, साधना पोकळे, मनिषा भोर, ज्योती मुंजाळ उपस्थित होते. निवडणुकीनंतर गुलाल उधळून व फटाके वाजवून नवनिर्वाचित सरपंचांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच शोभा हिलाळ यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम समाजातील सर्व लोकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहचविण्याचा मानस सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केला.
डॉ.सुभाष पोकळे – माजी पंचायत समिती सदस्य,शिरूर 
 ” कवठे येमाईच्या नवनिर्वाचित सरपंच शोभा हिलाळ व त्यांचे सहकारी गावाच्या विकासात निश्चित चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करतील. समाजातील शेवटच्या घटकाला व सर्वसामान्य ग्रामस्थांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील”. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *