ज्ञानगंगा येथे “वाणिज्य क्षेत्रातील करिअर च्या संधी” या विषयावर CA चैतन्य वाघ यांचे व्याख्यान संपन्न 

304

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : जागतिकीकरणाच्या व उदारीकरणाच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पातळीवर कार्यरत असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. परिणामी वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उच्च व निम्नस्तरीय रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत. कुशल कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे. परंतु आपल्यातल्या अनेकांना विशेषत:विज्ञान शाखेतल्या संधींविषयी बर्‍यापैकी माहिती असते, त्याविषयी चर्चाही बरीच होताना दिसते, पण वाणिज्य शाखा गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने विकसित होत आहे, त्यामानाने त्याबद्दल विद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती मात्र पुरेशी नसल्याचे दिसून येते आहे. याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील बाबुरानगर येथील ज्ञानगंगा विश्व विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स च्या वतीने आज दिनांक 26 जुलै रोजी ” वाणिज्य क्षेत्रातील करिअर च्या संधी ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए. चैतन्य अविनाश वाघ उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुलांना कॉमर्स मध्ये विविध क्षेत्रातल्या भविष्यातील संधी तसेच C A, CS, CMA यांसारख्या अनेक कोर्स विषयी माहिती दिली. जागतिकीकरणाच्या रेट्यात व्यवसाय व व्यवहाराचे स्वरूप बदलल्याने वाणिज्य शाखाही अर्थातच अधिक विकास पावली आहे. तसेच अभ्यासविषय देखील बदलले आहेत. त्यातून या विद्याशाखेतील करिअरच्या संधीही वाढल्या आहेत. त्यामुळे दहावी-बारावीनंतर आपल्या अभ्यासाचा मार्ग ठरवण्यापूर्वी या नानाविध संधी समजून घेणे हिताचे ठरेल. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सी.ई.ओ डॉ. नितीन घावटे, मुख्याध्यापक संतोष येवले, कॉलेज समन्वयक व्हि.डी.शिंदे,  विभाग प्रमुख अनुश्री औटी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ जांभळकर यांनी केले. तर व्याख्यानाची सांगता विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तराने करण्यात आली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *