पुणे : ११०० तुळशीच्या रोपांतून साकारला भारत

371

शांतता, शुद्ध हवा आणि सौहार्दाच्या वातावरणासाठी तुळशी लावण्याचा संदेश

पुणे (-प्रतिनिधी, सचिन दांगडे) : देशात शांतता, सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, तसेच आपल्याला शुद्ध हवा आणि पवित्र वातावरण मिळावे, या भावनेतून तुळशीच्या रोपांतून भारताचा नकाशा साकारण्यात आला. बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या या उपक्रमात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत तुळशीच्या रोपांपासून भारतीय नकाशा साकारला.

आषाढी एकादशी आणि गुरुपपोर्णिमेचे औचित्य साधून तुळशीचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी पर्यावरण रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. ही रोपे सर्व विद्यार्थी व शिक्षकांना वाटण्यात आली. संचालिका कँप्टन शालिनी नायर, प्रा. अंकित जैन, प्रा. अमोल गुप्ते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, भारतीय सीमांच्या रक्षणासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, आपल्यामध्ये वृक्षारोपण करण्याची भावना निर्माण व्हावी, तसेच मुलांना तुळशीचे महत्त्व समजावे व त्यांना वृक्षांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तुळस ही एक गुणकारी औषधी वनस्पती आहे. गेल्या हजारो वर्षांपासून अनन्य साधारण महत्व असलेल्या तुळशीची पूजा आपण करतो. सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसात दोन वेळा तुळशीला पाणी घालणे आणि दिवे लावण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. कुटुंबातील सर्वांचे रक्षण तुळशी करत असते, अशी यामागे आपली भावना आहे. तुळस हे शांततेचे प्रतीक असून, भारताच्या चहुबाजूनी सीमेलगत ही तुळशीची रोपे लावलायला हवीत. त्यातून शांततेचा संदेश जाईल. आपल्या देशात आणि संपूर्ण विश्वात शांतता आणि सौहार्दाच्या स्थापनेसाठी देशाच्या सीमेजवळ राहणाऱ्या सर्व लोकांनी शासकीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पवित्र तुळशीच्या रोपांचे वृक्षारोपण करावे”
वर्षा उसगावकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “तुळस ही आपल्यासाठी अतिशय जवळची आहे. आपल्या अंगणात असलेल्या तुळशीमुळे घराचे वातावरण प्रसन्न व शुद्ध राहते. तुळशी औषधी वनस्पती असून, त्याचे अनेक फायदे आहेत. औषंधापासून ऑक्सिजनपर्यंत सर्व गोष्टी देणाऱ्या तुळशीचे रोपण आपण मोठ्या प्रमाणात केले पाहिजे.”



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *