शिरूर,पुणे : घोडगंगेच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यानंतरच आपण जागे होणार का ? भ्रष्टाचार प्रकरणी लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार – संजय पाचंगे, अध्यक्ष क्रांतिवीर प्रतिष्ठाण

972
          शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात झालेला भ्रष्टाचार व विविध प्रश्नी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यानंतरच जनता जागी होणार का ?  असा संतप्त सवाल क्रांतिवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला आहे. कायद्याचे राज्य आहे की नाही ? का भ्रष्टाचार करणार्‍यांना कायदा लागुच नाही. तो फक्त सर्व सामान्य माणसाला लागु आहे ? असे देखील पाचंगे म्हणाले.
          घोडगंगा कारखान्याचे कर्ज किती आहे हे पाचंगे व त्यांच्या सहकाऱयांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. मग या बाबतीत कारखान्यात झालेल्या भ्रष्टाचाराला पाठीशी तर घातले जात नाही ना ?
कि शेतकर्‍यांचा,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा बळी देऊन राजकीय सौदेबाजीचा प्रयत्न तर होत नाही ना ? असे असताना विधानसभेचे संभाव्य उमेदवार याबाबत काहीच का बोलत नाही त असा प्रश्न ही संजय पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.
         याच विषयास अनुसरून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट वायरल केली आहे. त्यात त्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या एका  ठेकेदाराने चिमनीवरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा दिला असल्याचे नमूद केले आहे. मग या ठेकेदाराने दिलेला इशारा का ? व कशासाठी याची तात्काळ चौकशी करण्याची गरज पाचंगे यांनी व्यक्त केली आहे.
         घोडगंगा कारखान्यातील भ्रष्टाचार व इतर विविध विषयांस अनुसरून संजय पाचंगे यांनी थेट कारखान्या समोरच दहा दिवस उपोषण केले होते. त्यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासह घोडगंगेवर पदाधिकारी म्हणून काम केलेले अनेक आजी माजी नेते ही उपस्थित होते.पण ही सर्व मंडळी त्यानंतर आजपर्यंत याबाबत काहीएक  बोलायला तयार नसल्याचे पाचंगे म्हणाले.
प्राप्त माहितीनुसार घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा फक्त विधानसभा निवडणुकीपुरता तग धरून ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले .घोडगंगा कारखान्याच्या सखोल चौकशी करण्याच्या राज्याच्या सहकार मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे आजपर्यंत काय झाले.? चौकशी समितीने गेल्या सात महीन्यात का चौकशी केली नाही?
शेतकऱ्यांच्या मालकीचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना असुनही त्यांच्यावर हुकुमशाही गाजवली जात असल्याचा आरोप संजय पाचंगे यांनी केला आहे. राजकारण होत राहील पण एकदा का कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पालनपोषणाचा आधार घोडगंगा साखर कारखाना बंद पडला तर खाजगी साखर कारखान्याचे मालक हुकुमशाही चालवाटली आणि सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकरी वेठीस धरून लुटला जाण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे. याचा प्रत्यय  सध्या सुरू असलेल्या अनेक खासगी साखर कारखान्यातुन येत असल्याचे ते म्हणाले.
शिरूर तालुक्यातील अनेकांवर इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी पडल्या.. मग १७/१८ वर्षे भ्रष्टाचार करणार्‍यांवर का धाडी पडत नाहीत.?  गेली १७/१८ वर्षे जवळपास २० हजार शेतकऱ्यांना लुटणारे अजुनही कारखान्याच्या सत्तेवर नागोबा सारखे वेटोळे घालून बसले आहेत.चालु वर्षि घोडगंगा कारखान्याने उसाला किती बाजारभाव दिला ? भ्रष्टाचारी कार्यकारी संचालकांची बदली होऊनही ते घोडगंगातच तळ ठोकून असल्याबाबत अनेक शेतकरी संपर्क साधून विचारणा करत असल्याचे पाचंगे म्हणाले.
आज ठेकेदार आत्महत्या करण्याचा इशारा देत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर घोडगंगा कर्ज बाजारीपणामुळे सुरु होणे शक्यच नाही अशी आज तरी परीस्थिती पहावयास मिळत आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतानाच कारखान्याकडे असलेल्या कर्जाच्या ओझ्याचा संचालकांच्या ७/१२ वर सुद्धा बोजा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कदाचित कारखान्याच्या संचालक मंडळातील प्रामाणिक संचालकांची स्थावर मालमत्ता गोठवली तर त्यांच्यावरही ही वेळ येऊ शकते अशी शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे.
जर चौकशी समीतीने घोडगंगा कारखान्या संदर्भातील चौकशी गुंडाळून टाकण्याचे प्रयत्न केले तर त्यांचे विरुदध लवकरच न्यायालयात गुन्हा दाखल करणार असुन जे भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही शासनाला दिले आहेत. त्या आधारे आम्ही लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे संजय पाचंगे यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *