पुण्यात ‘सूर मोरपंखी’ कार्यक्रमातुन रसिकांना परमानंदाची अनुभुती

826
       पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – चांदण्यात फिरताना धरलास माझा हात… चांदणी रात्र ही जवळी घेशील का… केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली… उजाडल्यावरी सख्या निघून जा घरी… भय इथले संपत नाही… वचने तुला दिलेली मज पाळता न आली… अशा अजरामर शब्द-सुरावटींनी साकारलेल्या ‘सूर मोरपंखी’ने रसिक श्रोत्यांना परमानंदाची अनुभूती दिली. देवी स्तवन अन ‘परम सुखाचा परमानंद साई आनंद’ने त्यावर स्वरसाज चढला, तर चंदेरी दुनियेतील तारे आणि संगीतातील मांदियाळी यामुळे ‘सूर मोरपंखी’ उत्तरोत्तर बहरत गेले.
      निमित्त होते, प्रसिद्ध ऍक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ. सुमिता सातारकर यांनी गायलेल्या ‘सूर मोरपंखी’ या अल्बमच्या प्रकाशन सोहळ्याचे! घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रात रंगलेल्या या सोहळ्यासाठी प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर व अभिनेत्री सुखदा खांडकेकर, तबलावादक भरत कामत व वक्ते डॉ. विकास आबनावे उपस्थित होते.
       अल्बमच्या प्रकाशनाआधी डॉ. सुमिता सातारकर यांचा सांगीतिक प्रवास उलगडतानाच अल्बममधील काही निवडक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुमिता यांच्या गायनाला किशोर कौशल यांच्या संगीताची, प्रसाद जोशी यांच्या तबल्याची, तर मिलिंद गुणे यांच्या ताल संयोजनाची उत्तम साथ मिळाली असून, तितकेच समर्पक निवेदन तनुजा रहाणे यांचे लाभले आहे.
        लहानपणापासूनच वडिलांमुळे गायनाची गोडी लागली. मात्र, आयुष्याच्या काही टप्प्यावर प्राधान्यक्रम ठरवताना गाणे मागे पडले; मात्र, ते सोडले नाही. ‘ऍक्युपंक्चर’मध्ये झोकून देऊन काम करत असतानाच आता गायनाला वाव देण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. सुमिता सातारकर म्हणाल्या. हाताने नस पकडून रुग्णाला बरे करणाऱ्या डॉ. सुमिता आता स्वरांनीही रसिकांचे कान तृप्त करताहेत, याचा आनंद वाटत असल्याचे अभिजित खांडकेकर यांनी सांगितले.
         डॉ. सुमिता यांना जशी स्पर्शाची आस आहे, तशीच स्वरांचीही आहे. त्यांच्या स्पर्शाच्या जादूने रुग्ण बरा होतो, तशीच त्यांच्या स्वरांची जादूही हृदयस्पर्शी आहे, असे सुखदा खांडकेकर म्हणाल्या. भरत कामत यांनीही डॉ. सुमिता यांच्या गाण्याविषयी असलेल्या प्रेमाचे कौतुक केले. डॉ. विकास आबनावे यांनी सुमिता यांना उपजतच स्वरांची जाण आणि आवाजाचे भान असून, त्या उत्तम गायिका होतील. ऍक्युपंक्चर आणि गायन या क्षेत्रात सुमिता लीलया वावरतात अशा शब्दात कौतुक केले. तनुजा रहाणे यांनी सूत्रसंचालन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *