केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये `ग्रॅव्हिटी २०२०’चे उद्घाटन

325
पुणे  (-प्रतिनिधी, सचिन दांगडे) : “बदलत्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून त्याला संशोधनाची जोड दिली, तर आपल्या भवतालच्या अनेक समस्यांवर उपाय शोधता येतील. सध्याचे युग स्वयंचालनाचे असून, त्यामध्ये असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अग्रभागी राहायला हवे. शिकताना समाजहिताचे प्रयोग करत राहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले, तर स्वतःसह देशाच्या प्रगतीला हातभार लागेल,” असे मत ‘इन टू थिंग्ज ऍटोमेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक चोरडिया यांनी केले.
येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या केजे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनॅजमेन्ट रिसर्चच्या वतीने महाविद्यालयाच्या आवारात आयोजित अभियांत्रिकी आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी सहाव्या राष्ट्रीय स्तरावरील ‘ग्रॅव्हिटी २०२०’ या प्रकल्प आणि पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. प्रसंगी इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्राँनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे (आईटीई) अध्यक्ष किशोर शेंडे, उपाध्यक्ष प्रा. एस. के. खेडकर, ‘एम्निकॉन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप डोंगरे, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, कॅम्पस संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ‘ग्रॅव्हिटी २०२०’चे प्रमुख समन्वयक डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी अकॅडमीचे प्राचार्य डॉ. निलेश उके, ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत शिंदे, ‘ग्रॅव्हिटी २०२०’चे समन्वयक प्रा. प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रताप डोंगरे म्हणाले, “आपल्या शिक्षणाला संशोधनाची जोड देऊन समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सर्जनशील विचारातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी धडपडले पाहिजे. अत्याधुनिक विज्ञानाची निर्मिती करून परदेशात जशी विज्ञानाने क्रांती केली, तशी आपल्याकडे व्हायला हवी.”
हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, “तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना कौशल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. समाजातील वंचित घटकांपर्यंत ते पोहचविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्यासाठी समाजाने एकत्रित येऊन प्रयत्न करावेत. आमच्यासारख्या संस्था त्यामध्ये पुढाकार घेत आहेत.”
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या शाखांतील विद्यार्थी ‘ग्रॅव्हिटी २०२०’मध्ये देशभरातून जवळपास ८०० प्रकल्प व पोस्टर, तर १८०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांमधील तंत्रकौशल्य विकसित व्हावीत, या उद्देशाने ग्रॅव्हिटीचे गेल्या सहा वर्षांपासून आयोजन करत असल्याचे प्रास्ताविकात डॉ. सुहास खोत यांनी सांगितले. किशोर शेंडे यांनी ‘आईटीई’विषयी माहिती देताना राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. सुषमा आखाडे, प्रा. अमृता ताकवले यांनी केले. प्रा. प्रमोद चव्हाण यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *