विज्ञान परिषदेतर्फे बासरी निर्मितीवर कार्यशाळा

325

 पुणे (-प्रतिनिधी, सचिन दांगडे) : “बासरी हे आदिम वाद्य आहे. या वाद्यामधून अनेक श्रुतीमनोहर स्वर वाजवता येतात. हे वाद्य दिसायला सोपे वाटले तरी यावर रागदारी वाजवायला अवघड आहे. हे स्वस्त आणि मस्त वाद्य आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारे वाद्य आहे. लहान मुलांमध्ये संगीताचे बीज रुजवायचे असेल, रुची निर्माण करायची असेल, तर संपूर्ण ओंकाराची अनुभूती देणाऱ्या बासरी या वाद्याची उपयुक्तता आहे,” असे प्रतिपादन जेष्ठ बासरीवादक डॉ. केशव गिंडे यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे शिक्षक कै. प्रभाकर यशवंत उर्फ पी. वाय. जोशी यांच्या स्मरणार्थ बासरी निर्मितीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना बासरी निर्मितीचे आणि वादनाचे धडे दिल्यानंतर ‘बासरीचे विज्ञान’ या विषयावर झालेल्या सप्रयोग व्याख्यानात गिंडे बोलत होते. विविध शाळांमध्ये इयत्ता सातवी ते नववीत शिकत असलेल्या ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यशाळेला सुनिल अवचट, निलेश देशपांडे, प्रकाश बेहेरे, जितेंद्र रोकडे, प्रमोद देशपांडे, संजीव पाटणकर, अभय पटवर्धन, रमेश फडके, विजय अगरवाल या बासरीवादकांचे सहकार्य लाभले. प्रसंगी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, अशोक तातुगडे, दिपाली आकोलकर, शशी भाटे, डॉ. सुजाता बरगले, संयोजक विलास रबडे आदी उपस्थित होते.

केशव गिंडे यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बासरीवादनाचे ज्ञान देतानाच बासरी वादनामधून ओंकाराचा अभ्यास अधिक ताकतीने करू शकतो, असे सांगितले. बांबूला छेद करत स्वतः तयार केलेली बासरी हाताळण्यांची तसेच त्याचे वादन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. बासरीचे वैशिष्ट्य, बासरीच्या जन्माची, तसेच निर्मितीची कहाणी, तिचे प्रकार, तिच्या वादनाचे धडे अतिशय रंजकपणे गिंडे यांनी उलगडून दाखवले. चांगली बासरी बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. केशव गिंडे यांनी बासरीवादन करत उपस्थितांची मने जिंकली. तबल्यावर अरविंद परांजपे यांनी साथ केली. दिपाली अकोलकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्रकुमार सराफ यांनी आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *