श्री येमाई देवस्थान जवळील साहित्य विक्रेत्यांना किराणा किट भेट – कोरोना योद्धयांकडून मदतीचा हात 

559

  कवठे येमाई ता.शिरूर : (देवकीनंदन शेटे,संपादक) – कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण देशात मागील अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खेडेगावात ही हीच परिस्थिती असून विविध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या अनेकांचे व्यवसायच बंद असल्याने आता त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री येमाई मंदिर ही लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पूर्णपणे बंद आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असणारे देवीच्या साहित्याचे येथील सर्वच विक्रेते व कुटुंबाचे हाल सुरु झाल्याचे निदर्शनास येताच येथील कोरोना योद्धे गावाचे तरुण सरपंच अरुण मुंजाळ,अनिल रायकर,सुरेश गायकवाड व अमोल शिंदे यांनी आज देवस्थान जावळालील ११ विक्रेत्यांना ११ हजार रुपयांचे किराणा व जीवनावश्यक साहित्य देऊन मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

  कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र हाहाकार सुरु आहे. हाताशी असलेली कामे,व्यवसाय बंद असल्याने ग्रामीण भागातील अनेक कामगार,छोटे व्यावसायिक, गोरगरीब व निराधार यांना जीवनावश्यक साहित्यासह आर्थिक विवंचना जाणवू लागली आहे. अशा लोकांना अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत.सध्याची भीषण व वास्तव परिस्थिती पाहता साजरे होणारे वाढदिवस,लग्नकार्य व इतर कार्यक्रमासाठी करण्यात येणारा खर्च वाचवून तो खऱ्या अर्थाने मदतीची गरज असलेल्या लोकांपर्यंत त्यांना पाहिजे असलेल्या धान्य,किराणा,कपडे,घरगुती लागणारे साहित्य देऊन करण्याची गरज आहे.      –अरुण मुंजाळ, सरपंच कवठे येमाई 

मागील ३ महिन्यांपासून कवठे येमाई गावात रात्रंदिवस कोरोना योद्धा म्हणून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या या ४ जणांनी आज ११ जणांना दिलेली किराणा व इतर साहित्याची मदत त्या कुटुंबांना पुढील किमान २० दिवस पुरेल एवढी दिली असली तरी गावातील तरुण वर्ग गरज असलेल्या लोकांना वेळोवेळी मदतीचा हात देत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *