लहान मुलांना करोनामुक्त करणारी ‘हिरकणी’

346

तब्बल 8 तास ‘पीपीई’ कीट घालून उपचार

पुणे (-प्रतिनिधी, सचिन दांगडे) : करोनाच्या संकटात अनेक डॉक्टर आपलं कर्तव्य अगदी चोखपणे बजावत आहेत. त्यातीलच एक डॉ. प्राजक्ता प्रमोद जंगम ह्या असून त्या करोनाबाधित लहान मुलांवर उपचार करतात. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक लहान मुलांना त्यांनी जीवनदान दिले असून, योग्य उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. ज्या दिवशी लहान मुलं करोनामुक्त (डिस्चार्ज) होतात. तेव्हा, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो, असं डॉ. प्राजक्ता जंगम आवर्जून सांगतात. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्या कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नरमध्ये डॉ. प्राजक्ता या लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. लहानपणापासूनच त्यांनी आपण मोठेपणी डॉक्टर व्हायचं हे निश्चित केलं होत. त्या दिशेने त्यांनी पाऊल टाकत ते स्वप्न सत्यात उतरवलंही. त्या एक उत्तम डॉक्टर असून करोनाच्या संकटात देशसेवा करत आहेत. करोनाबाधित रुग्ण असलेल्या कक्षात काम करत असताना प्राजक्ता यांना मोठं आव्हान असतं. पीपीई कीट घालून तब्बल आठ तास करोनाबाधित मुलांसोबत त्यांना काढावे लागतात. कधीकधी तर  त्यांना जराही उसंत मिळत नाही. नुकतंच अवघ्या दीड महिन्याच्या चिमुकल्याला त्यांनी आणि त्यांच्या टीमने करोनामुक्त केलं आहे. डॉ. प्राजक्ता यांचं शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण हे जुन्नर येथे झाले. त्यानंतर त्यांनी नगर येथून एम.बी.बी.एस. चे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, पुण्यातील ससून रूग्णालयात प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात फेब्रुवारी महिन्यात मुलाखत दिली होती. त्यानंतर मार्च महिन्यात प्राजक्ता यांना रुजू होण्यास सांगितले. मात्र, तेव्हाच करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात काही करोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामुळे प्राजक्ता यांना रुग्णालयात नोकरी करण्यास पाठवायच का नाही? असा प्रश्न घरच्या व्यक्तींना पडला होता. परंतु, वडिलांनी प्राजक्ता यांना तुझी इच्छा असेल, तर नोकरी कर असे सांगतीले. तेव्हा, प्राजक्ता यांनी देशसेवा करण्याची संधी मिळाली असून, लोकांचे प्राण वाचावेत अशी प्रामाणिक इच्छा डॉक्टरची असते असे सांगून नोकरी करण्याची इच्छा दर्शवली. त्यावेळेसपासून त्यांनी आत्तापर्यंत पाठीमागे वळून पाहिलं नाही.
डॉ. प्राजक्ता प्रमोद जंगम म्हणाल्या, ” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला. याचा मला सार्थ अभिमान आहे. वैद्यकीय क्षेत्रात अजून पुढे जात समाजकार्य करायची इच्छा आहे. मी जेव्हा रुग्णालयात रुजू झाले होते तेव्हा करोना विषाणूचे दहा बाधित रुग्ण होते.  नवीन आजार असल्याने काही प्रमाणात मनात भीती होती. त्या कक्षात काम करणं हे खूप मोठं आव्हान होतं. लहान मुलांवर उपचार करणे खूप आव्हानात्मक असतं. लहान मुले ही लवकर आजारातून बरे होत आहेत, त्यामुळं एक डॉक्टर म्हणून नक्कीच आनंद आहे. करोनाबाधित लहान मुलांना डिस्चार्ज दिला जातो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. तो अनमोल क्षण माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. वडिलांना मी थँक्यू  म्हणेल त्यांनी मला आज इथपर्यंत आणलं आणि डॉक्टर बनवलं. देशासाठी काहीतरी करू शकले याचा आनंद आहे!

मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण 

-डॉ. प्राजक्ता प्रमोद




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *