मुरबाड,ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या लिपिकांना मिळणार 11 टक्के व्याज दराने कर्ज, कर्मचाऱ्यांनी मानले बँकेचे आभार

733
           मुरबाड,ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (टीडीसीसी) जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना 11 टक्के व्याजदराने पगारतारण कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश महाळुंगे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बॅंकेचे संचालक सुभाष पवार यांचे आभार मानले आहेत.
            जिल्हा परिषद व खासगी मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना साडेदहा टक्के व्याजदराने पगार तारण कर्ज दिले जाते. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेतील लिपिकांना 12 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. विशेषतः ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विविध शाखांमध्येच लिपिक संवर्गाचे वेतन खाते आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अन्याय होत असल्याची भावना होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश महाळुंगे, खजिनदार संजय कवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बॅंकेचे संचालक सुभाष पवार यांना साकडे घातले होते. तसेच शिक्षकांप्रमाणेच साडेदहा टक्के व्याजदराने कर्ज देण्याची मागणी केली होती. या संदर्भात बॅंकेचे चेअरमन राजेंद्र पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन सुभाष पवार यांनी दिले होते. संचालक सुभाष पवार यांच्या प्रयत्नांनंतर बॅंकेने पगारतारण कर्जाचा दर 11 टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लिपिक वर्गाला दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल संघटनेने सुभाष पवार यांचे आभार मानले आहेत.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *