आदिवासींसाठी निसर्गोपचार रूग्णालय सुरू ; राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने लोकार्पण 

324
घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : आदिवासी बांधवांनी घरच्या घरी राहून सशक्त राहावे यासाठी माती, पाणी, वायु, सुर्यप्रकाश व आकाश या पंच महाभुतांव्दारे आरोग्याचे ज्ञान देण्यासाठी गोहे बु. (ता. आंबेगाव) येथे खास आदिवासींसाठी निसर्गोपचार रूग्णालय सुरू करण्यात आले. २० खाटांच्या या रूग्णालयाचे उद्घाटन गांधी जयंतीला ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले असल्याचे डॉ. शिवकेश कुमार सिंग यांनी सांगितले.
आयुष मंत्री श्रीपाद नाईक व राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी ऑनलाईन पध्दतीने या उपक्रमाचे दि. २ रोजी या रूग्णलायाचे लोकार्पण केले. महात्मा गांधी यांच्या भारतामध्ये ग्रामस्वच्छता, स्वावलंबन आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून कमीत कमी खर्चात आदिवासींचे आरोग्य राखणे, या उद्देशाने राष्ट्रीय निसर्गोपचार चिकित्सा संस्था व आदिवासी विकास विभाग यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाची गोहे बु. येथे आदिवासी आश्रमशाळा आहे. त्या इमारतीचे रूग्णालयात रूपांतर करण्यात आले. यासाठी ४७ लाख रूपये खर्च झाला. राष्ट्रीय निसर्गोपचार चिकित्सा संस्था हे रूग्णालय चालवणार आहे. या परिसरातील आदिवासीं गावे, पाडयांवर जाऊन निसर्गोपचाराव्दारे चिकित्सा करण्यात येईल. यामध्ये मणक्याचे स्नान, माती स्नान, अंतर्जल मालीश, योग वर्ग आदिं उपचारांव्दारे महिला व पुरूषांवर उपचार केले जाणार आहे. आदिवासी हे पारंपारीक उपचार पध्दतीचा आजही मोठया प्रमाणावर अवलंब करीत असल्याने त्यांच्या उपचार पध्दतीची माहिती संस्थेचे डॉक्टर स्वतः परिसरात फिरून गोळा करतील. ते ज्ञान रेकॉर्डवर आणून त्याचा उपयोग करण्याबाबतही प्रयत्न करणार आहे. आदिवासी विकास विभागाकडे सुमारे ५०० आश्रम शाळा आहेत. या शाळांमार्फत निसर्गोपचाराचे पारंपारीक ज्ञान देण्यात येणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *