कोरोनाच्या उपचारासाठी खासगी डॉक्टर व खासगी रुग्णालयांची मदत गरजेची – दिलीप वळसे पाटील  

595

  शिरूर,पुणे  :  (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यात नागरिक काळजी घेत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. डॉक्टर, परिचारिका, उपकरणे, औषधे रुग्णांसाठी जेवण, नाश्ता आदी सुविधांसह दोन हजार बेड्स तयार केले तरच भविष्यात कोरोनासाठी तालुक्यात उपचार पद्धती चालू होईल. खासगी डॉक्टर व खासगी रुग्णालयानेही कोरोनाच्या उपचारासाठी मदत करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव  दत्तात्रेय नगर येथे आयोजित शिरूर तालुक्यातील कोविड १९ आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, तहसीलदार लैला शेख, माजी आमदार पोपटराव गावडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी आर. डी. शिंदे, पोलिस निरीक्षक सुरेश राऊत, मानसिंग पाचुंदकर, राजेंद्र गावडे, प्रमोद पऱ्हाड, सविता बगाटे उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले कि,  शिरूर शहरासह तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने रूग्ण संख्या वाढत आहे. पण त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून मलठण येथे प्रस्तावित ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात यावे. यासाठी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत निर्णय होऊन देखील कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये आरोग्य विभागाबाबत चुकीचा संदेश जात आहे. 39 गावाशी संबधित 3 जिल्हा परिषद गटामध्ये 3 अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियूक्ती करावी. तालुक्यामध्ये 50 ऑक्सिजन बेड्स तयार करण्यात यावे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आरोग्य विभाग, महसूल व पोलिस यंत्रणेला याबाबत सहकार्य करून नागरिकांना कोरोनामध्ये लढण्याचे बळ द्यावे असे आवाहन ही वळसे पाटील यांनी यावेळी केले.
रांजणगाव औद्यागिक वसाहतीमध्ये पुणे येथून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेने योग्य काळजी घेऊन संबंधितांवर सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर न केल्याबद्दल कारवाई करावी. आंबेगाव –  शिरूर विधानसभा मतदारसंघात शिरूरच्या 39 गावांमध्ये कोरोना बाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. नागरिक कोणतीही काळजी न घेता कामाव्यतिरिक्त फिरत आहेत. पुढील किमान 16 महिने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असून शासनाने दिलेल्या नियमानुसार वागा, नाहीतर भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. प्रशासनाला साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *