मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन

318

अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, संचालक हितलभाई मेसवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात 50 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन संकुलात रिलायन्स इंडस्ट्रीजने उभारलेल्या  50 बेडची  क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या  ई-उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, नागोठणे रिलायन्स मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे,एचआर हेड चेतन वाळंज हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, आमदार रविशेठ पाटील,आमदार  अनिकेत तटकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय ससाणे तसेच नागाेठणे रिलायन्स इंडस्ट्रीजचे आयआर हेड विनय किर्लोस्कर, इस्टेट हेड अजिंक्य पाटील, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, डॉ.उद्धव कुमार, डॉ.प्रशांत बारडाेलाेई हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील करोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता येथील नागरिकांना योग्य पध्दतीने कोविड आजारावर उपचार मिळण्याकरिता रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आवश्यक सोयी-सुविधा, अद्ययावत वैद्यकीय सामुग्रीसह उभे केलेले हे 50 बेडचे कोविड केअर सेंटर सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. करोनासारख्या या मोठ्या संकटात रिलायन्स,टाटा,बिर्ला यासारख्या कंपन्यांनी पुढे येऊन जी मदत केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, या संकटावर संघटितपणे आपण सर्वजण निश्चितपणे मात करू.शासन सर्व प्रकारे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्नशील आहे. करोनाच्या संसर्गातून बऱ्या होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे, ही दिलासादायक बाब आहे. प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जास्तीत जास्त करून सोशल डिस्टंन्सिंग,मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे या सूचनांचे पालन नागरिकांनी जास्तीत जास्त करावे, यासाठी अधिक प्रयत्न करावेत,अशी सूचनाही केली. या कार्यक्रमाला नागोठणे परिसरातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *