दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन

385

नारायणगाव,ता.जुन्नर (-प्रतिनिधी,अतुल कांकरिया) : दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे वय ८२ यांचे आज दि ६ ऑगस्ट ला दुपारी एक वाजता त्यांचे जन्मगाव असलेल्या जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी येथे  वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन सायंकाळी ६ वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मुरलीधर शिंगोटे बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी ७ मार्च १९३८ ला झाला होता. इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *