बारवी प्रकल्पातील तळ्याची वाडी व कोळे वडखळ भोवती पाणीच पाणी 

562
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) :  मुरबाड तालुक्यातील बारवी प्रकल्पातील तळ्याची वाडी व कोळे वडखळ या प्रकल्पग्रस्त वाड्यातील नागरिक सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवीधरणाच्या पाण्यात वेढल्याने जिल्हाधिकारी ठाणे यांच्या मार्फत मुरबाड तहसीलदार यांना निवेदन देऊन उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आहे.  
 
 बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोळे वडखळ गाव काल गुरुवार पासून पाण्याने वेढले गेल्याने गावाचे बेटात रूपांतर झाले आहे. तेथील लोकांना होडीतून प्रवास करावा लागत आहे. चारही बाजूला पाणी असल्याने होडीतून प्रवास करण्यास घाबरणारी सुमारे तीस कुटुंबे गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बांधलेल्या झोपड्या मध्ये रहात आहेत. 
बारवी धरणाची उंची वाढल्या मुळे मागच्या वर्षी पासून कोळे वढखळ  गावाला जाणारा रस्ता पाण्या खाली जात आहे. तेथील लोकांना होडीतून प्रवास करण्यासाठी एमआयडीसी तर्फे सोय केली आहे. तर तळ्याची वाडी येथे गावाच्या तीन बाजूला पाणी व एका बाजूला जंगल यामुळे गावात जाण्यास रस्ताच नाही. तेथील एका महिलेला प्रसूतीसाठी झोळी मधून आणावे लागल्याचे वृत्त समाजशील ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. कोळे वडखळ व तळ्याची वाडी येथील गावचे पुनर्वसन झालेले नाही, त्यामुळे येथील लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने 5 ऑगस्ट रोजी दोन आठवड्यात या ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठा व वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
तळ्याची वाडी येथील विहिरी जवळ धरणाचे पाणी आल्याने पाणी प्रदूषित होते. गावात साप विंचू येतात त्यामुळे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा, पेस्ट कंट्रोल सुविधा द्यावी तसेच तळ्याची वाडीचे अन्य धरणग्रस्त प्रमाणे पुनर्वसन होई पर्यंत एमआयडीसी तर्फे खावटी वाटप करावे , सामूहिक व व्यक्तिगत वनहक्क धरणात गेल्याने त्याची भरपाई व पुनर्वसन , गावात विविध सुविधा उपलब्ध करण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *