आंबेगाव तालुक्यातील ४ गावातील ३५५ लोकांची रॅपिड अँटीजन तपासणी – ६९ जण कोरोना पॉझिटीव्ह 

328
            घोडेगाव ता.आंबेगाव : (प्रतिनिधी,सीताराम काळे) – घोडेगाव , काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी व आंबेगाव गावठाण या चार गावांमधील  कोरोना  शिरकाव रोखण्यासाठी ४५ पथकांनी सर्व्हेक्षण केले. यामध्ये  सुमारे दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करुन ३५५ लोकांची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली असता यामध्ये ६९ लोक कोरोना पॉझिटीव्ह निघाले असल्याचे तहसीलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.
             आंबेगाव तालुक्यात मंचर गावांतील नागरीकांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर घोडेगाव व परिसरातील गावे तपासणीसाठी शुक्रवार दि.११ रोजी हाती घेण्यात आली. यासाठी गुरुवार दि.१० रोजी सर्व कर्मचा-यांना घोडेगाव येथे तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर शुक्रवार दि.११ रोजी सकाळी ९ वाजल्या पासून घरोघरी तपासणी सुरू झाली.  तपासणीसाठी नेमलेला कर्मचा-यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याची आरोग्य तपासणी केली व यामध्ये संशयीत सापडणा-या रूग्णांची लगेच अ‍ॅन्टीजेन तपासणी करून निगेटीव्ह, पॉझिटीव्ह असल्याची पडताळणी केली. हे करण्यासाठी शुक्रवारी घोडेगाव मधील सर्व दुकाने, बॅंक, पतसंस्था बंद ठेवण्यात आली. फक्त मेडिकल दुकाने व दवाखाने चालू होते. घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यांनी लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला व तपासणी करून घेतली.
    आरोग्य तपासणी करण्यासाठी ४५ पथके , अतिरीक्त २२ कर्मचारी, स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये संशयीत आढळणारे ३५५ जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यात ६९ जण पॉझिटिव्ह आढळुन आले. यामध्ये घोडेगाव, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ – शिंदेवाडी व आंबेगाव गावठाण या चार गावांतील ४१ जण आहे. तर या आरोग्य तपासणी दरम्यान इतर गावांतील नागरीकांनीही रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेतली  ते इतर गावांतील २८ जण आहे.
       मंचर, घोडेगाव या मोठया गावांमध्ये आरोग्य तपासणी एकाच दिवशी केल्यामुळे बाधित झालेले लोक सापडत आहेत. त्यामुळे बाधित लोकांना पुढे जावून निर्माण होणा-या अडचणी कमी होत आहेत.  यासाठी तालुक्यातील वाढता आकडा रोखण्यासाठी सर्व्हेक्षणाचे हे काम अतिशय फायदेशीर ठरणार आहे.  पुढील काही दिवसांत आंबेगाव तालुका नियंत्रणात असेल असा विश्वास तहसिलदार रमा जोशी यांनी व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *