अलिबाग,रायगड : ताडवागळे येथील प्रिमियर चिक फिड कंपनीमुळे आरोग्याला धोका रोगराईची साथ पसरण्याची शक्यता,शिवसेना नेते राजा केणी यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

611
          अलिबाग,रायगड : ताडवागळे येथील प्रिमियर चिक कंपनीतील टाकाऊ पदार्थ उघड्यावर फेकलेे जात असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या कंपनीविरोधात योग्य ती कारवाई केली नाही, तर शिवसेना स्टाईलने या कंपनी प्रशासनाला जाब विचारला जाईल, असा इशारा शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी दिला आहे. शुक्रवारी (ता.2) रोजी त्यांनी आरोग्य अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून सत्य परिस्थिती निदर्शनास आणून दिली.
           प्रिमियर चिक कंपनीमध्ये अंडी, चिकन आणि खाद्यपदार्थ यांचे उत्पादन केले जात असून या कंपनीमध्ये डम्पींग ग्राऊड नसल्याने शिल्लक राहिलेला कचरा ताडवागळे परिसरात मोकळ्या जागेत फेकला जातो. या कचर्‍यापासून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी निर्माण होत असल्याने या परिसरातील नागरिकांना उलटी, जुलाब यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. कचरा उचलण्यासाठी कंपनीच्या मुजोर अधिकार्‍यांना वारंवार विनंती करुनही दुर्लक्ष्य केले जात आहे. यातून आजाराची मोठी साथ येण्याची शक्यता असल्याची येथील नागरिकांचे म्हणणे आहे. कंपनीच्या या भूमिकेचा येथील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या कचर्‍याच्या दुर्गंधीचा त्रास खुद्द शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनाही सोसावा लागत असून त्यांच्या फार्म हाऊसच्या गेट समोरच ही घाण टाकलेली आहे. मेलेल्या कोंबड्या, खराब झालेली अंडी, कोंबडीची पिसे अशी घाण उघड्यावर टाकण्यात आलेली आहे. याचे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मोकळ्या जागेलाच प्रिमियर चिक कंपनीने डम्पिंग ग्राऊड बनविले आहे.  हा सर्व प्रकार येथील नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असल्याचे राजा केणी यांचे म्हणणे आहे. जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेवून ही परिस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही तक्रारीचे निवेदन देण्यात आले.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *