मुरबाडमध्ये दहा वर्षे आमसभाच न झाल्याने अनेक समस्या प्रलंबित – पंचायत समिती प्रशासन उदासीन 

426
          मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्याच्या आमसभेला मुरबाड पंचायत समिती गेली 10 वर्ष बगल देत असून विरोधी पक्षाच्या अनेक वेळा मागण्या करून सुद्धा आमसभा न झाल्याने मुरबाड पंचायत समिती प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे.यामुळे आमदार, मतदारसंघातील मतदार व तालुक्यातील प्रशासन यांच्यात थेट होणारा संवाद बंद झाला आहे. आमसभा न झाल्याने अनेक नागरिकांना आपल्या गावच्या समस्या मांडणे, तालुक्याचा विकास आराखडा व झालेली कामे याची कुठलीही माहिती मिळत नसून अनेक समस्या प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.
           माजी आमदार गोटीराम पवार यांच्या कारकिर्दीत झालेली आमसभा ही अंतिम आमसभा ठरली. तर विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या कारकिर्दीत मुरबाड पंचायत समितीची एकही आमसभा झाली नाही.  तत्कालीन गटविकास अधिकारी हाश्मी यांनी आमसभा लावण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी आमदार व पंचायत समितीचा ताळमेळ  न बसल्याने आमसभा होऊ शकली नव्हती. मुरबाड मध्ये राज्यातील  विरोधी पक्षाचे आमदार असून  राज्यातील सत्तेत असलेले महाविकास आघाडीतील घटक पक्ष मुरबाड तालुक्यातील विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत.  मात्र या विरोधी पक्षाच्या मागणीचा विचार करण्यात पंचायत समिती उदासीन असून आमसभा न होण्यामागे काही तरी दडलंय अशी दबक्या आवाजात मुरबाड मध्ये चर्चा सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आमसभेच्या प्रतिक्षेला आता एक तप पूर्ण होणार असून आमसभेची प्रतीक्षा कधी संपेल ? याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *