कवठे येमाई,पुणे : कोणी पाणी देता का पाणी ? म्हणण्याची कान्हूर मेसाई व परिसरातील ८ गावांवर वेळ, अती तीव्र दुष्काळी गावात समावेश करा – सुधीर पुंडे व नागरिकांची मागणी

1068
          कवठे येमाई,पुणे :  सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील  पठारी भागातील कान्हूर मेसाई परिसरातील आठ गावे व वाडया वस्त्यांवरील नागरिक व जनावरांना भीषण पाणी व चारा टंचाईस गेल्या एक महीन्यापासून तोंड द्यावे लागत आहे. पावसाळा अद्याप ८ ते ९ महिने दूर असल्याने नोव्हेबर महिन्यातच या भागातील तीव्र पाणी टंचाईची दाहकता समोर येत आहे. त्यामुळे कोणी पाणी देता का पाणी ? म्हणण्याची वेळ कान्हूर मेसाई व परिसरातील ८ गावांवर आली आहे. तर या गावांचा शासनाने अती तीव्र दुष्काळी गावात समावेश करावा अशी मागणी कान्हूर मेसाई येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर पुंडे व ग्रामस्थांनी केली आहे.
          स्वातंत्रोत्तर काळानंतर अनेक निवडणुका झाल्या. या भागातील मह्त्वाचा असणारा पाणी प्रश्न निवडणुकी वेळी फक्त सोडविण्याचे आश्वासन देऊन या भागातील नागरिकांना पाण्यावाचून केवळ झुलवत ठेवण्याचा प्रकार लोकप्रतिनिधींनी केला असल्याचा आरोप आता पाण्यासाठी आर्त टाहो फोडणाऱ्या या परिसरातील नागरिकांमधून होताना दिसत आहे.वेळोवेळी पाणी प्रश्न सोडविण्याचे गाजर दाखवत केवळ  मतांसाठी सातत्याने दुष्काळाचा सामना करत असलेल्या कान्हूर मेसाई व परिसरातील आठ गावांचा पाणी प्रश्न आत्तापर्यंत भिजवत ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या भागातील नागरिकांसाठी पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याकामी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आता निर्माण झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
       शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील,पठारी भागात असलेल्या व सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत असलेल्या कान्हूर मेसाई,मिडगुलवाडी,मोराची चिंचोली,खैरेवाडी,खैरेनगर,शास्ताबाद,लाखेवाडी,वरुडे,वाघाळे,गारकोलवाडी,घोलपवाडी,फलकेवाडी, ढगेमळा,पुंडेवस्ती या परिसरात पाणी टंचाईचे भीषण संकट येथील नागरिकांसमोर उभे राहिले आहे. विहिरी,तलाव,नाले, बोअरवेल पावसाअभावी अनेक ठिकाणी कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागातील पाण्याचे संकट आता अधिकच भीषण झाले आहे. पाळीव प्राण्यांचा चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. रब्बी हंगाम सोडाच पण खरिपात ही येथील अनेक गावातील शेतकऱयांना नापिकीला सामोरे जावे लागले आहे. पाण्यावाचून माणसांनी व जनावरांनी जगायचे कसे व करायचे काय असा यक्ष प्रश्न या भागातील भीषण दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या नागरिकां समोर भेडसावत आहे.
         पाणी टंचाईची दाहकता लक्षात घेत या गावातील नागरिक आता एकवटले असून सरकारने पाणी प्रश्न युद्धपातळीवर मार्गी न लावल्यास आगामी निवडणुकांवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचा इशारा सुधीर पुंडे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच कान्हूर येथील मेसाई मंदिरात झालेल्या पाणीपरिषदेत देण्यात आला आहे. या महत्वाच्या प्रश्नी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी या भागातील नागरिकांना पाणी प्रश्नी भक्कम पाठिंबा देत शेतकरी शिष्टमंडळासह शासन दरबारी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे हा प्रश्न मांडून या भागातील सातत्याने जाणवत असलेल्या पाणी समस्येवर योग्य त्या उपाय योजना तातडीने राबविण्यासाठी आग्रही भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच पालक मंत्री गिरीश बापट यांच्या सह या भागातील पाणी प्रश्नावर शिक्रापूर येथे एक बैठक आयोजित केली होती. यात वळसे पाटील यांनी पाणी प्रश्न त्वरेने सोडविण्याकामी अभ्यासू कमेटी स्थापन करून २/३ ठिकाणचा सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे व त्यानुसार लवकच या गावांतील जुणे व नवे लोकांसह कमेटी स्थापन करून लवकरच या भागात कंटूर सर्वे करणार असल्याची माहीती सुधीर पुंडे यांनी दिली. तर या गावांतील पाण्याचा हा गंभीर प्रश्न अतितात्काळ मार्गी लावण्यासाठी जलद पाठपुरावा करणार असल्याचे वळसे पाटील यांनी अश्वासन दिल्याचे पुंडे म्हणाले.
        तर या दुष्काळी गावांतील नागरिकांची पाणी प्रश्ना बाबत भूमिका आता अधिकच तीव्र व परखड झालेली असल्याचे पाहावयास मिळत असून निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ टँकरद्वारे पाणी देऊन तात्पुरती मलमपट्टी न करता सरकारने कायमस्वरूपी व ठोस निर्णय तातडीने घेऊन प्रत्यक्ष कृतीत या भागातील नागरिकांना पाणी मिळण्याकामी जलद उपाय योजना करण्याची गरज सुधीर पुंडे व या भागातील टंचाईग्रस्त नागरिकांतून होत आहे.
– प्रा.सुभाष शेटे,( कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *