कृषी पंपांच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका – सरकारच्या बदलत्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका 

645

            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथम शेतकऱ्यांची वीज न तोडण्याचे सरकारचे धोरण असल्याचे जाहीर केले असताना विधानसभेचे अधिवेशन संपतेसमयी थकीत वीज बील असणाऱ्या कृषी पंपांचे कनेक्शन खंडित करण्याच्या सूचना सरकारनेच दिल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. शिरूर तालुक्यातील कृषी पंपाची थकीत व मोठी वीज बिल बाकी वसुलीसाठी महावितरण कडून अनेक शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे.  तर काही ठिकाणी विद्युत रोहित्रच बंद करण्यात आले आहे.राजकीय नेते व सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून शेतीपंपाची थकबाकीत वाढ होण्यास महावितरण,राजकीय नेते व सरकारच जबाबदार असून ऐन उन्हाळी हंगामात पिकांची तहान भागवण्यासाठी बळीराजा तारेवरची कसरत करत आहे.अशा संकटाच्या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असताना शेतीपंपाची वीज तोडून सरकार सूडबुद्धीने वागून शेतकऱ्यांना आणखी खाईत लोटत असल्याचा आरोप अनेक गावातील संतप्त शेतकरी करत आहेत.

महावितरणकडून शिरूर तालुक्यातील वीज पुरवठा होत असलेल्या कवठे येमाई,जांबुत, फाकटे,वडनेर खुर्द या गावातील कुकडी व घोड नदी काठचे विद्युत रोहित्र बंद केल्याने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.नदीच्या काठचे शेतीपंप बंद झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. तसेच विहीरी,कुपनलिका शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात हाताशी आलेली पिके सुकू लागली आहेत.जनावरांचा चारा,पिण्याचे पाणी वीजे अभावी प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मार्चच्या कडक तापमानात पिकांची तहान भागविण्यासाठी कोणताच पर्याय नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.फाकटे येथे शेतीपंपाची कनेक्शन तोडण्याऐवजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी थेट रोहित्रच बंद केल्यामुळे अनेक विहिरी कुपनलिका बरोबर घरांचा वीजपुरवठा खंडीत होऊन नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली असे शेतकरी गुलाब गावडे,पवन वाळुंज यांनी सांगितले.त्यामुळे वीजे अभावी जनावरांच्या पाण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ ऐन उन्हाळ्यात नागरिकांवर येण्याची शक्यता निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे थकीत वीजबिल माफ करू शेतीपंपाला मोफत वीज देऊ या राजकीय नेते व सरकारच्या खोट्या अश्वासनामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा आकडा फुगत गेला. तसेच कोरोनाच्या संकटात शेतीपंपाना वीजबिलात सवलत देण्याच्या खोट्या वल्गना करत एक वर्षाने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची अवास्तव बिल आकारणी करणाऱ्या सरकारने बळीराजाला लाखो रूपयांची थकबाकीची बिले देऊन बळीराजाचा अवमान केला आहे.किसान सन्मानाच्या योजना राबवणाऱ्या शासनाने थकीत वीजबिलाची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या डोक्यावर ठेऊन बळीराजाचा एकप्रकारे विश्वासघात केला आहे असा आरोप संतप्त शेतकरी वर्गातून होत आहे.
          मार्च महिन्यातील कडक उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे.सध्या उन्हाळी कांदा पोसण्यासाठी पाण्याची नितांत गरज असून या पिकांना चार दिवसांतच पाणी देण्याची गरज असताना आता पिकांची तहान भागवायची कशी ? 
   —–  नवनाथ जोरी
शेतकरी जांबुत ता.शिरूर
               ऐन उन्हाळ्यात मार्च एंडला शेतकऱ्यांच्या समोर बँकाचा तगादा सुरु असताना आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या शेतीपंपाची वीज बिले माफ करण्याची खोटी अश्वासनने देणाऱ्या या शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.लाखो रुपयांची थकीत वीजबिलाची टांगती तलवार मानगुटीवर ठेवत ऐन कडक उन्हाळ्यात शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून शेतकऱ्यांना संकटात ढकलणाऱ्या सरकारचा जाहिर निषेध करण्यात येत आहे. कोणतीही पूर्व सुचना न देता तोडलेली वीज कनेक्शन पुन्हा त्वरित जोडून द्यावी तसेच थकीत वीजबिल वसुली व शेतीपंपाची वीजतोडणी तत्काळ थांबवावी अन्यथा बेल्हा – जेजुरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.
         —–  माऊली ढोमे
अध्यक्ष, कृषी क्रांती शेतकरी संघटना

           गेले वर्षभर कोरोनामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.  सद्य स्थितीत कोरोनामुळे शेतमालाला अपेक्षित बाजारभाव नाही.बँकेच्या तगाद्याने शेतकरी त्रस्त असतानाच थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी शासनाने वीजतोडणीचे आदेश दिले असून संकटात सापडलेल्या बळीराजाला आणखी संकटात टाकण्याचे सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणार आहे. 
—— पवन वाळुंज – शेतकरी,फाकटे  




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *