पिंपरी पेंढारमध्ये घरफोडी करुन चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लांबविला

462

पिंपरी पेंढार,ता.जुन्नर (-प्रतिनिधी, अशोक डेरे) : येथील जांभूळपट शिवारातील विशाल जयसिंग कुटे यांच्या घरात प्रवेश करुन कपाटामधील सुमारे सव्वाआठ तोळ्याचे दागिने व साठ हजार रुपये रोख असा एकून पाच लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपरीपेंढार येथील जांभूळपट शिवारात राहणारे  विशाल कुटे हे काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सर्व कुटुंबियांसोबत बाहेर गेले होते. त्यानंतर ते सर्वजण रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा घरी आले. त्यावेळी त्यांना घराच्या उत्तर बाजूस असलेला दरवाजा उघडा दिसला व आतमधील खोलीत जाऊन पाहिले असता चोरट्यांनी त्यांच्या कपाटामधील दागिने व पन्नास हजार रुपये रोख नेले असल्याचे निदर्शनास आले. या चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने घराच्या छप्परावर चढून कौले काढली व आत प्रवेश केला असल्याचे दिसून आले. याबाबत कुटे यांनी या घटनेची माहिती तात्काळ ओतूर पोलिस स्टेशनला कळविली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे व टीमने रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. त्यानंतर सकाळी जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, घटनास्थळी पुण्यावरुन श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकही येऊन दाखल झाले. पुढील तपास ओतुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *